IPL 2020 : मुंबईचा बंगळुरूवर पाच गडी राखून विजय, सूर्यकुमार यादव ठरला विजयाचा शिल्पकार

एमपीसी न्यूज  – सूर्यकुमार यादवने केलेल्या दमदार खेळीमुळे मुंबईने बंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळविला. यादवने  43 चेंडूत  79 धावा करत मुंबईला हा विजय मिळवून दिला.

बंगळुरूने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात सामान्य झाली. क्वीन्टन डिकाॅक  18 धावा करून सहाव्या षटकात बाद झाला तर, इशान किशन 25 धावा करून सातव्या षटकात बाद झाला. त्यानंतर आलेल्या सौरभ तिवारी 5 धावा करून तंबूत परतला कृणाल पंड्या देखील स्वस्तात परतला.

सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत दमदार खेळी केली त्याला हार्दिक पंड्याने साथ दिली. यादवने  43 चेंडूत नाबाद  79 धावा केल्या तर पंड्याने 17 धावा केल्या. पंड्या बाद झाल्यानंतर कायरन पोलार्ड सोबत यादवने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

सुरुवातीला बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये दमदार सुरूवात करत अर्धशतकी (54) भागीदारी केली. दमदार सुरूवातीनंतर बंगळुरूला आठव्या षटकात पहिला धक्का बसला.

जोशुआ फिलिप 24 चेंडूत 33 धावा काढून माघारी परतला. देवदत्त पडीकलने फटकेबाजी सुरू ठेवत 30 चेंडूत धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं. कर्णधार विराट कोहली 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स (15) झेलबाद झाला.

त्यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊन्सर चेंडू टाकत शिवम दुबेला 2 धावांवर माघारी धाडलं. त्याच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकललाही बुमराहने 74 धावांवर झेलबाद केले.

पडीकल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला गळती लागली. मुंबईच्या वेगवान आघाडीने धावगतीवर चाप लावल्याने बंगळुरूला 20 षटकात 6 बाद 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. बुमराहने 3 तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डने 1-1 बळी टिपला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.