IPL 2020 : मुंबईचा कोलकातावर 8 गडी राखून विजय; गुणतालिकेत मुंबई अव्वलस्थानी

एमपीसी न्यूज – ओपनिंग बॅट्समन क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे.

कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने 148 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईची सुरुवात दमदार झाली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटोन डी कॉकने चांगली सुरुवात केली. मात्र, लयीत खेळत असताना कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला.

रोहितने 36 चेंडूत 35 धावा केल्या. रोहित जरी संथ खेळत असला तरी डी कॉक फटकेबाजी सुरुच होती. रोहितनंतर आलेला सूर्यकुमार यादवही अवघ्या 10 धावा करुन परतला.

त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि डी कॉकने मुंबईला विजय मिळवूनचं मैदान सोडले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठी लवकर बाद झाला. नितीश राणालाही चांगली खेळी करत आली नाही. 5 धावा करून तो बाद झाला. शुबमन गिल देखील चुकीच्या फटक्यामुळे कॅचआऊट झाला. त्याने 23 चेंडूत 21 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही 4 धावांवर बाद झाला. राहुल चहरने 2 चेंडूमध्ये 2 बळी घेत कोलकाताला मोठा धक्का दिला.

फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल आजही अपयशी ठरला.त्याने अवघ्या 12 धावा केल्या. निम्मा संघ लवकर तंबूत परतल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली.

या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत संघाला 148 पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 53 धावा केल्या.

कर्णधार मॉर्गनने 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने दोन विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाइल आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.