IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा 48 धावांनी विजय; गुणतालिकेत मुंबई अव्वल स्थानी

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्सने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबचा डाव 143 धावांत आटोपला. पंजाबला 48 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

मुंबईचा हा दुसरा विजय ठरला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर, पंजाबची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्सने उभारलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले.

मयंक अग्रवाल 25, राहुल 17, तर करुण नायर शून्यावर माघारी परतले. निकोलस पूरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबईने चेंडूने आज शिस्तबद्ध कामगिरी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी 2 तर ट्रेंट बोल्ट व कृणाल पांड्याने 1- 1 गडी बाद केला.

यापूर्वी, पहिली फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून कर्णधार रोहितने 45 चेंडूत 70 धावा केल्या, तर मागच्या मॅचचा हिरो इशान किशन 32 चेंडूत 28 रन करून आऊट झाला. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि संघाला 191 धावांपर्यंत मजल मारून दिली.

पोलार्डने 20 चेंडूत 47 रन केले, यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता, तर हार्दिकने 11 चेंडूत 30 धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबकडून काॅट्रेल, शमी आणि गौथम यांनी 1-1-1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.