IPL 2020 : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय

गुणतालिकेत 18 अंकांसह मुंबई अव्वलस्थानी तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. आजच्या पराभवानतंर प्ले ऑफमधील दिल्लीचे आव्हान खडतर बनले आहे. गुणतालिकेत 18 अंकांसह मुंबई अव्वलस्थानी आहे तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

प्रथम फलंदाजी करीत दिल्लीने नऊ गडी गमवून 111 धावांचे किरकोळ लक्ष्य मुंबईपुढे ठेवले. त्याचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनीही त्याला साथ देत चांगली कामगिरी केली. 14.2 षटकांतच मुंबईने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले.

मुंबईकडून ईशान किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. ईशान किशनने 42 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली. या खेळीत ईशान आठ चौकार आणि तीन षटकार लगावले. तर क्विंटन डीकॉकने 26 तर सूर्यकुमारने 12 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिक नॉर्टजेन एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा संघ 110 धावाच करु शकला. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला. पृथ्वी शॉ 10 धावा काढून बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यरने 25 तर ऋषभ पंतने 21 धावा केल्या. थिमरन हेटमायरने 11, आर अश्विन 12, कसिगो रबाडाने 12 धावा केल्या.

मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3-3 तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.