IPL 2020 : मुंबई पुन्हा अव्वलस्थानी, दिल्लीवर 5 गडी आणि 2 चेंडू राखून मात

एमपीसी न्यूज – मुंबई आणि दिल्लीच्या संघात झालेल्या सामन्यात मुंबई दिल्लीवर भारी पडली. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकामधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीला पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली आणि रनरेटच्या जीवावर मुंबई पुन्हा अव्वलस्थानी पोहोचली आहे.

दिल्ली कडून शिखर धवनने नाबाद 69 धावांची खेळी केली होती. पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह मुंबई गुणतालिकेत परत अव्वलस्थानी पोहचली आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे सात सामन्यांत 10 गुण असले तरी मुंबई नेट रनरेटच्या बळावर अव्वल स्थानी पोहोचली आहे.

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ चार धावांवर माघारी परतला.

ट्रेंट बोल्टने त्याला झेलबाद केले. थेट स्पर्धेच्या सातव्या सामन्यात पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणे चांगली फलंदाजी करत होता. पण कृणाल पांड्याने त्याला पायचीत पकडलं.

रहाणेने 15 चेंडूत 15 धावा केल्या. कर्णधार अय्यर आणि सलामी फलंदाज शिखर धवनने दिल्लीचा डाव सावरला आणि चौदाव्या षटकात संघाला शतक करून दिलं.

संघाच्या शतकानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर 33 चेंडूत 42 धावा काढून बाद झाला. कृणाल पांड्याने त्याला झेलबाद केले. त्यानंतर फटकेबाजीची जबाबदारी घेतलेला मार्कस स्टॉयनीस आणि शिखर धवन यांच्यावरून धाव घेण्यावरून गोंधळ झाला.

याच गोंधळात स्टॉयनीस 13 धावांवर धावबाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 52 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. मुंबईच्या कृणाल पांड्याने 2 तर ट्रेंट बोल्टने 1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.