IPL 2020 : पंजाबचा बंगळुरूवर 97 धावांनी विजय, के. एल. राहुलच्या नावे हंगामातील पहिले शतक

एमपीसी न्यूज – कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद 132 धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या 207 धावांचे आव्हान पेलण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अपयश आले. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर तळाच्या फलंदाजांच्या अपयशी प्रयत्नानंतर बंगळुरुचा संघ अवघ्या 109 धावांत आटोपला. पंजाब हा सामना 97 धावांनी जिंकला यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यातील हा सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय आहे.

पंजाब ने उभारलेल्या 207 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराटच्या बंगळुरु ब्रिगेडला पंजाबच्या गोलंदाजांनी हतबल केले. फिंच (20) एबी (28) वगळता आघाडीच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. वाशिंग्टन सुंदरने बंगळुरुकडून सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. बिश्नोई आणि एम अश्विन यांनी प्रत्येकी 3, शेल्डर काँट्रेल 2 आणि ग्लेन मॅक्सवेल याने एक विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यापूर्वी पंजाबने 20 षटकात तीन गड्यांच्या बदल्यात 206 धावा केल्या यामध्ये कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद 132 धावांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. राहुल नंतर मयंक अग्रवाल ने 20 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. बंगळुरुकडून शिवम दुबेने दोन तर चहल ने एक गडी बाद केला. सर्वाधिक 132 धावा करणारा लोकेश राहुल सामानावीर ठरला. राहुलने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिले शतक ठोकण्याचा मान मिळवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.