IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

एमपीसी न्यूज – विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची विजयी सुरवात केली आहे. हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोने सामना सावरायचा प्रयत्न केला पण मधल्या फळीतल्या फलंदाजांची एका पाठोपाठ एकाच्या विकेटमुळे हैदराबादला हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं. 

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. पांडे-बेअरस्टो जोडी मैदानात चमत्कार घडवणार असं वाटत असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने 46 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांनिशी 61 धावा केल्या.

युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला. मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर फारसा स्थिरावू शकला नाही. युजवेंद्र चहलने तीन बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी 2-2 तर स्टेनने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

_MPC_DIR_MPU_II

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या 90 धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात 163 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय फसला. पदार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या देवदत पडीकलने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पडीकलने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली. पडीकलने 45 चेंडूत 8 चौकारांनिशी त्याने 56 धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. डिव्हीलियर्सने 51 धावांची खेळी केली. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.