IPL 2020 : संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ ; पंजाबचा राजस्थानवर 4 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सान्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला.

लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. प्रत्युत्तरात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने झुंजार शतक ठोकत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजाबने राजस्थानवर 4 धावांनी निसटता विजय मिळवला.

पंजाबने कडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. सुरवातीला मयंक 14 धावा करुन बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने संघासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रियान परागने ख्रिस गेलला 40 धावांवर बाद केले. त्यानंतर 13व्या षटकात कर्णधार लोकेश राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी करत राहुलसोबत 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. राहुल हुड्डाने 18व्या षटकात 45 चेंडूत आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. हुड्डा 64 धावांची वादळी खेळी करून बाद झाला. पूरनला भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या शेवटच्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. राहुलने 50 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकरांसह 91 धावांची खेळी केली. राजस्थानकडून चेतन साकारियाने 3, ख्रिस मॉरिसने 2 बळी घेतले.

पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सलामीवीर बेन स्टोक्स शून्यावर माघारी परतला. मनन वोहरा, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला. वोहरा आणि स्टोक्स बाद झाल्यावर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सांभाळला. या दोघांनी 45 धावांची भागीदारी रचली. बटलर 25 धावा काढून बाद झाल्यानंतर सॅमसनने 11व्या षटकात आपले अर्धशतक आणि संघाचे शतक पूर्ण केले. बटलर बाद झाल्यानंतर मैदानात आलेला शिवम दुबे 23 धावांची खेळी करून बाद झाला.

यानंतर रियान पराग आणि सॅमसन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. 19 षटकात या दोघांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. सॅमसनने आपली आक्रमकता कायम राखत 54 चेंडूत शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजुला असलेल्या तेवतियाला मात्र मोठी खेळी करता आली नाही. मेरेडिथने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 13 धावांची गरज होती. मात्र, या षटकात अर्शदीपने 8 धावा देत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एका चेंडूत 5 धावा असताना सॅमसन झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 119 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीपने 3 तर, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.