IPL 2021: अत्यंत रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर चेन्नईने केली ‘केकेआर’वर मात!

जडेजाने फिरवला एक हाती सामना

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – आज केकेआरचा कर्णधार आईन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली पण दुर्दैवाने त्यांची सुरूवात अजिबात चांगली झाली नाही. युवा प्रतिभावंत गील त्याच्या संघाला शुभ सलामी देऊ शकला नाही आणि तो केवळ 5 चेंडूत 9 धावा करून धावबाद झाला.दुसऱ्या बाजुने आपल्या लागोपाठ दोन सामन्यातल्या प्रभावी कामगीरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि प्रभावीत करणारा वेंकटेश अय्यर आणि चांगल्या फॉर्मात असणारा राहुल त्रिपाठी यांनी या नुकसानीची भरपाई करताना आणखी 40 धावा जोडून संघाला अर्धशतक गाठून दिले खरे पण आधीच्या दोन्ही सामान्य मोठी खेळी करणारा वेंकटेश अय्यर तो फॉर्म आज कायम ठेवू शकला नाही आणि ठाकूरच्या गोलंदाजीवर धोनीच्या हातात झेल देऊन वैयक्तिक18 धावांवर बाद झाला.

यावेळी संघाची धावसंख्या केवळ 5 षटकातच 50 झाली होती,पण याच्या बदल्यात दोन मोठ्या विकेट्सचे नुकसान झाले होते. राहुल त्रिपाठी नेहमीप्रमाणे चांगले खेळत होता,त्याला साथ द्यायला कर्णधार मॉर्गनही आला होता पण आतापर्यंत तरी या स्पर्धेत मॉर्गनला आपला जलवा दाखवता आलेला नाही, दुर्दैवाने आजही तेच चित्र कायम राहिले आणि केवळ आठ धावा काढून तो हेजलवूडचा बळी झाला, त्याच्या जागेवर आलेला नितीश राणा आज आक्रमक अंदाजात खेळत होता, त्यामुळे कोलकाता संघाच्या मोठ्या धावासंख्येच्या आशा अद्यापही कायम होत्या.

पण राहुल त्रिपाठी सुद्धा जडेजाच्या चेंडूवर 45 धावां करून त्रिफळाबाद झाल्यावर मात्र अब क्या होगा आगे अशी चिंता केकेआरला पडली,पण रसेल, आणि राणाने फारशी चिंता न करता फटकेबाजी सुरू ठेवली.आंद्रे रसेलने आपल्या कीर्तीनुसार फटकेबाजी चालू केलीय असे वाटत होते, पण संघाची धावसंख्या 125 असतानाच रसेल सुद्धा ठाकूरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात त्रिफळाबाद झाला,तेव्हा कोलकाता संघाच्या 16.4 षटकात केवळ 125 च धावा झाल्या होत्या,आणि कोलकाताच्या सहा विकेट्स पण गेल्या होत्या, त्यामुळे दीडशे धावा तरी होतील का नाही संघाच्या असे वाटत असतानाच दिनेश कार्तिकने तुफानी हल्ली चेन्नई गोलंदाजीवर चढवला आणि बघताबघता संघाला सावरले सुद्धा.

20व्या षटकातल्या चौथ्या चेंडुवर बाद होण्याआधी कार्तिकने केवळ 11च चेंडूत आक्रमक 26 धावा करतांना तीन चौकार आणि एक षटकार मारून संघाला कठीण अवस्थेतून बऱ्यापैकी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.केवळ त्याच्या ,आणि राणा,रसेलच्या आक्रमक फलंदाजीमुळे कोलकाता संघाने आपल्या 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या,नितीश राणाने 27 चेंडूत नाबाद 37 धावा करत संघाला सावरण्यात मोठा वाटा उचलला.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने अतिशय किफायतशीर गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात केवळ 20 धावा देताना दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या तर जडेजाने सुद्धा आपल्या चार षटकात 21 धावा देत त्रिपाठीचा महत्वपूर्ण बळी मिळवला.केकेआर कडून त्रिपाठीने सर्वाधिक 45 तर राणाने नाबाद 37 धावा केल्या.

172 धावांचे लक्ष्य गाठायचे असेल तर त्यासाठी उत्तम सुरुवात ती सुद्धा आक्रमक अंदाजात व्हायला हवी, चेन्नई संघाचे वैशिष्ट्य हेच की ते जे ठरवतात अगदी तसेच करतात, आणि आजही याचे प्रत्यंतर देताना ऋतुराज गायकवाड आणि डूप्लेसीने पहिल्या पॉवरप्ले मधील सहा षटकांतच नाबाद अर्धशतकी भागीदारी नोंदवताना चेन्नई का सुपर किंग आहे याची झलक दाखवली.

डूप्लेसीकडे तरी प्रचंड अनुभव आहे पण कोवळा पुणेकर ऋतुराज गायकवाडने फारसा आंतरराष्ट्रीय अनुभव नसताना सुद्धा आंतरराष्ट्रीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना आपले भवितव्य उज्वल असेलच असे खात्रीपूर्वक दाखवले आहे असे म्हटले तर काही चूक ठरणार नाही.बघताबघता या जोडीने जवळपास पाऊणशतकी सलामी भागीदारी जोडली असतानाच ऋतूराज आंद्रे रसेलच्या चेंडुवर मॉर्गनच्या हातात झेल देऊन केवळ 28 चेंडूतच 40 धावा करताना दोन चौकार आणि तीन उत्तुंग षटकार मारले.

इतक्या आक्रमक आणि चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नई सुपर किंगला विजयाची खात्री वाटायला लागलीच होती ,त्यातच चेन्नई कडे जबरदस्त फलंदाजीही आहे.पण 20/20मधे कधीही काहीही होवू शकते हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.चांगले खेळत असतानाच डूप्लेसी 43 धावांवर बाद झाला.पाठोपाठ अंबाती रायडू आणि मोईन अली ही.

यावेळी चेन्नईला विजयासाठी 9 धावांहून अधिक सरासरीने धावा हव्या होत्या, साहजिकच कोणी तरी हल्ला चढवणारच होते,पण ते करताना चेन्नईच्या विकेट्स जायला लागल्या, धोनी , रैना, करण याच नादात बाद झाले आणि सहज जिंकेल असे वाटताना चेन्नई पराभूत होते की काय अशी आशंका यायला लागली, पण महेंद्रसिंग धोनीचा विश्वासू आणि लाडका सर रवींद्र जडेजाच्या मनात मात्र जबरी करुन दाखवायचे होते, त्याने मनातले सत्यता उतरवना तुफानी शब्दाला सुध्दा लाजवेल अशी फटकेबाजी करत केवळ सहा चेंडूत 2 चौकार आणि दोन षटकार मारत विजय हातातोंडाशी आणला, आता फक्त सहा चेंडूत चारच धावा हव्या होत्या, पण लवकर विजय मिळवून देण्याच्या घाईत जडेजाही बाद झाला, तरीही विजय अवघड राहिला नव्हता, दोन चेंडूत एक धाव हवी असताना शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहरने डोके शांत ठेवत ती विजयी धाव घेतली आणि 2 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.

उपयुक्त गोलंदाजीसह तुफानी फलंदाजी करत विजय मिळवून देण्याची मोठी कामगिरी जडेजाने करून दाखवताना धोनी उगाचच त्याला सर म्हणत नाही हे सिद्ध करणारी विजयी कामगिरी केली. हातातोंडाशी आलेला विजय पराभावत रूपांतरित झाल्याने कोलकाता समर्थक नक्कीच निराश झाले असतीलही पण खऱ्या क्रिकेटरसिकांना एक अत्यंत उत्कंठावर्धक सामना बघण्याचा योग आज नक्कीच लाभला, नाही का?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.