IPL 2021 Final: चेन्नईच ठरले आयपीएलचे खरे ‘सुपर किंग्ज’! चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावत साजरी केली विजयादशमी!

धोनीने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवले, 'वय केवळ म्हणायला असते'!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – आयपीएल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दोन टप्प्यात ही स्पर्धा करोनाच्या महामारीमुळे घ्यावी लागली, ज्यात सर्वात ज्येष्ठ खेळाडूंचा संघ म्हणून खिजवली गेलेली सुपर कुल माहीची चेन्नई टीमच ‘सुपर किंग्ज’ ठरली. त्यांनी चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकताना दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या केकेआरचा तब्बल 27 धावांनी फडशा पाडत आपला डंका दशोदिशात वाजवत यावर्षीचा दसरा अविस्मरणीय आणि सोनेरी केला.

तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष ज्याकडे लागले होते, त्या आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्स समोर 193 धावांचे मोठे आव्हान ठेवून आपल्या चौथ्या विजेतेपदाकडे दमदार पाऊल टाकले होते. नाणेफेक जिंकून केकेआरने चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली खरी पण माहीच्या सुपर किंग्जने अप्रतिम खेळ करत मोठी धावसंख्या रचून मॉर्गनचा निर्णय  साफ चुकीचा ठरवला.

बहुचर्चित आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्याला आज दुबईच्या अप्रतिम मैदानावर सुरुवात झाली. नाणेफेक कोलकाता संघाचा कर्णधार आयन मॉर्गनने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या विजयी सामन्यातलाच संघ दोन्हीही संघाने कायम ठेवला.

कोलकाता संघाने याआधी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती आणि त्यातही योगायोग म्हणजे जेव्हा जेव्हा कोलकाता अंतिम फेरीत खेळले त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली होती तर चेन्नईने तीन वेळेस ही स्पर्धा जिंकण्याचा भीमपराक्रम याआधी केलेला होता.

चेन्नई कडून ऋतूराज आणि डूप्लेसी या जोडीने डावाची सुरुवात केली. तर शकीबने कोलकाताकडून गोलंदाजी सुरू केली. नेहमीप्रमाणे आजही या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. अर्थात नशीब पण यांच्या बाजूने होते. दिनेश कार्तिककडून डूप्लेसीचा एक झेल सुटला, तर एकदा तो धावबाद होता होता सुद्धा वाचला.याचा फायदा त्यांनी उठवला नसता तरच नवल!

पहिल्या पॉवरप्ले अखेरीस या दोघांनी नाबाद 50 धावा जोडल्या. ज्यात ऋतुराज 25 तर डूप्लेसी 23 धावांवर नाबाद होते. अखेर सुनील नारायणला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने ऋतुराजला 32 धावांवर शिवम मावीच्या द्वारे झेलबाद केले. ऋतुराजने 27 चेंडूत 32 धावा करताना तीन चौकार आणि एक शानदार षटकार मारला.

त्याच्या जागी पहिल्या कॉलीफाय सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणारा रॉबिन उथप्पा आला. त्याने जम बसलेल्या डूप्लेसीला चांगली साथ दिली. यामुळे दुप्लेसीने आयपीएलमधले 22 वे तर या हंगामातले 6 वे अर्धशतक केवळ 35 चेंडूतच नोंदवले ज्यामध्ये 5 चौकार आणि दोन षटकार सामील होते, त्याच्या धडाक्यामुळेच चेन्नईने केवळ 11 षटकातच आपल्या 100 धावा पूर्ण केल्या. आणि दुसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी सुद्धा, जी केवळ 26 चेंडूत आली होती.

यामुळे केकेआरच्या अडचणी वाढतील असे वाटत असतानाच सुनील पुन्हा एकदा नारायणासारखा धावून आला आणि त्याने धोकादायक ठरत असलेल्या रॉबिनला 31 धावांवर पायचीत केले. रॉबिनने केवळ 15 चेंडूत या धावा चोपताना 3 षटकार खेचले होते. यावेळी चेन्नईच्या 13 षटकातच 123 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर आला मोईन अली. धोनीचे निर्णय नेहमीच अनाकलनीय असतात, त्याने हे कित्येकदा सिद्ध केलेले आहे, त्याने या संपूर्ण स्पर्धेत मोईन अलीला वारंवार फलंदाजीसाठी प्रमोट केले आहे आणि मोईन अलीने आपल्या कर्णधाराला जराही निराश केले नाही. आजही मोईन जबरदस्त फलंदाजी केली. त्याने केवळ 20 चेंडूत नाबाद 37 धावा ठोकल्या ज्यात तीन षटकार आणि दोन चौकार होते.

कार्तिकने दिलेल्या जीवदानाचा जबरदस्त फायदा उठवून डूप्लेसीने केकेआरच्या जखमेवर मीठ चोळत थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 86 धावा काढल्या ज्या केवळ 56 चेंडूत आल्या. यामुळेच चेन्नईने आपल्या निर्धारित 20 षटकात 192 धावा काढून केकेआर समोर फार मोठे लक्ष ठेवून आपल्या चौथ्या विजेतेपदाचा दावा मजबूत केला. केकेआरकडून सुनील नारायण सोडला तर इतर कुठल्याही गोलंदजाला चेन्नईचा धडाका रोखता आला नाही. त्यामुळेच अंतिम सामन्यातल्या विजयाचे लक्ष्य त्यांच्यासाठी हिमालयाएवढे उत्तुंग ठरले.

तरीही विजयाचा पाठलाग करताना केकेआरने आपल्या ‘है तैय्यार’ या घोषवाक्याला साजेशी सुरुवात केली. शुभमन गील आणि वेंकटेश अय्यर या नव्या दमाच्या शिलेदारांनी कसलेही दडपण न घेता मुक्त आणि आक्रमक फलंदाजी करत त्यांनी नाबाद अर्धशतकी सलामी दिली.

दोघेही जबरदस्त आत्मविश्वास दाखवत खेळत होते. वेंकटेश अय्यर हा कोलकाताला या स्पर्धेत सापडलेला हिरा आहे. तो पेशाने CA आहे. त्यामुळेच खेळताना त्याच्या डोक्यात विजयाचे बॅलन्सशीट अचूक मांडलेले असावे, असा त्याचा खेळ असतो. आजही त्याने आपल्या जबरी फॉर्मचा योग्य फायदा उठवला आणि महत्वपूर्ण सामन्यात खेळ उंचावत आपले चौथे आणि अंतिम सामन्यातले पहिले अर्धशतक नोंदवून संघाला चांगली सुरुवात करून दिली.

अनुभवी जडेजाला लागोपाठ दोन षटकार मारून त्याने आपण अजिबात नवखे नाही हेच जणू सिद्ध केले. या दोघांनी धडाक्यात फलंदाजी केल्याने केकेआरच्या दहा षटकात बिनबाद 88 धावा करून आपले आव्हान जिवंत ठेवले. अर्थात यांना सुद्धा जीवदान मिळाले होते, अय्यरचा सोपा झेल चक्क धोनीने सोडला तर जडेजाच्या गोलंदाजीवर गीलचा रायडूने घेतलेला अप्रतिम झेल केकेआरच्या नशीबाने झेल मानला गेला नाही.पण या नशिबाने साथ पुढच्या काही क्षणातच सोडली आणि अय्यरची जबरदस्त खेळी मिडास स्पर्श ज्याला आहे असे म्हटले जाते त्या शार्दुल ठाकूरने संपवून आपल्या संघाला पहीले यशही मिळवून दिले.

अय्यर 32 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर मॉर्गनने आपल्या ऐवजी नितीश राणाला पाठवले खरे पण तो आल्या पाऊलीच डूप्लेसीच्या हातात झेल देवून ठाकूरची दुसरी शिकार ठरला.त्यानंतरही कर्णधार मॉर्गनने जबाबदारी घेण्याचे टाळत सुनील नारायणला फलंदाजीसाठी पाठवले आणि हेजलवूडने तो निर्णय साफ चुकीचा ठरवून सुनीलला नारायण आठवायला लावला.आणि मग आयन मॉर्गनला खेळायला यावेच लागले.

जिथे धोनी कठीण प्रसंगी जबाबदारी समर्थपणे स्वतःच्या खांद्यावर घेतो तिथे मॉर्गनने अशी जबाबदारी टाळणे दोन कर्णधारातला मोठा फरक सिद्ध करत होते. मात्र दुसऱ्या बाजूने या पडझडीने जराही विचलित न होता शुभमन गीलने आयपीएलमधले दहावे तर या स्पर्धेतले चौथे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यामुळे त्याला आणि संघाला झालेला आनंद क्षणभंगुर ठरला आणि दीपक चहरने त्याला 51 धावांवर पायचीत करत केकेआरला मोठा हादरा दिला.

यावेळी केकेआरची अवस्था 13 षटकात चार गडी बाद 108 अशी झाली होती आणि अद्यापही विजय 89 धावांनी दूर होता.साहजिकच चेन्नई संघाला विजयाची संधी जास्त होती. याच दडपणाखाली दिनेश कार्तिक सुद्धा  9 धावा काढून जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि केकेआरचा अर्धा संघ तंबूत परतला आणि त्याच षटकात जडेजाने शकीबला पायचीत करून चेन्नईला विजयाच्या आणखी जवळ आणले. आणि हे कमी की काय म्हणून शार्दुल ठाकूरने जखमी राहुल त्रिपाठीला मोईनच्या हातून झेलबाद करून आपला तिसरा बळी घेत केकेआरच्या अडचणीत आणखी भर पाडली.

यातून केकेआर सावरले नाही ते नाहीच. आणि त्यांना 27 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. युवा गील आणि अय्यरने दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा नंतरच्या एकाही केकेआरच्या फलंदाजाना उठवता आला नाही, आणि ते हाराकरी करून बाद झाले.

चेन्नईकडून ठाकूरने तीन तर जडेजाने दोन गडी बाद केले,तर कोलकाताच्या गील व अय्यरच्या अर्धशतकी खेळीला इतर कोणाचीही साथ न मिळाल्याने तिसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न साकार होवू शकले नाही. ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेत तब्बल 631 धावा ठोकून ऑरेंज कॅप पटकावताना आपले नाणे खणखणीतरित्या सिद्ध केले.

धोनीसाठी सुद्धा ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. कर्णधार म्हणून त्याचा हा 300 वा सामना होता, ज्यात त्याने 178 विजय मिळवले आहेत. त्याने 9 वेळा संघाला अंतिम फेरी गाठून दिली तर चार वेळा विजेतेपद!

मुंबई इंडियन्स नंतर सर्वाधिक चार वेळा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने केलेली आहे. चाळीशी ओलांडली असली तरी धोनी या स्पर्धेत तरुणांना लाजवेल असाच वाटला आहे.सांघिक खेळ करून घेण्यासाठी माही प्रसिद्ध आहेच, आजही त्याची प्रचिती आली.

86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलणारा फाफ डूप्लेसी सामनावीर ठरला, तर ऋतुराज मोस्ट इमेर्जिंग प्लेयर ठरला, ज्यास दहा लाख रुपये बक्षीस मिळाले, तर रवी बिष्णोईने घेतलेला झेल स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल ठरला. हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.