IPL 2021 Final : चेन्नई सुपर किंग्जने जिंकली चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष ज्याकडे लागले आहे, त्या आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 27 धावांनी सामना जिंकला आणि आयपीएलचे विजेतेपद चौथ्यांदा पटकवले.
प्रथम फलंदाजी करीत चेन्नईने कोलकोतासमोर 193 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. कोलकाताच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरूवात केली खरी, पण पुढे डाव पत्त्याच्या पानांसारखा कोसळला. 20 षटकांमध्ये कोलकाताला नऊ गडी गमावून 165 धावांपर्यंत मजल मारता आली.
Fantastic FOUR! 🏆 🏆 🏆 🏆
The @msdhoni-led @ChennaiIPL beat #KKR by 27 runs in the #VIVOIPL #Final & clinch their 4⃣th IPL title. 👏 👏 #CSKvKKR
A round of applause for @KKRiders, who are the runners-up of the season. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/JOEYUSwYSt pic.twitter.com/PQGanwi3H3
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2021
नाणेफेक जिंकून केकेआरने चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली खरी, पण माहीच्या सुपर किंग्जने अप्रतिम खेळ करत मोठी धावसंख्या रचून मॉर्गनचा निर्णय चुकीचा ठरवला.
बहुचर्चित आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्याला आज दुबईच्या अप्रतिम मैदानावर सुरुवात झाली. नाणेफेक कोलकाता संघाचा कर्णधार आयन मॉर्गनने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या विजयी सामन्यातलाच संघ दोन्हीही संघाने कायम ठेवला.
कोलकाता संघाने आजतागायत दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे आणि त्यातही योगायोग म्हणजे जेंव्हा जेंव्हा कोलकाता अंतिम फेरीत खेळले त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे,तर चेन्नईने तीन वेळेस ही स्पर्धा जिंकण्याचा भीमपराक्रम केलेला आहे.
चेन्नई कडून ऋतूराज आणि डूप्लेसी या जोडीने डावाची सुरुवात केली. तर शकीबने कोलकाताकडून गोलंदाजी सुरू केली.नेहमीप्रमाणे आजही या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली,अर्थात नशीब पण यांच्या बाजूने होते,दिनेश कार्तिक कडून डूप्लेसीचा एक झेल सुटला,तर एकदा तो धावबाद होता होता सुद्धा वाचला.याचा फायदा त्यांनी उठवला नसता तरच नवल.
पहिल्या पॉवरप्ले अखेरीस या दोघांनी नाबाद 50 धावा जोडल्या. ज्यात ऋतुराज 25 तर डूप्लेसी 23 धावांवर नाबाद होते.अखेर सुनील नारायणला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने ऋतुराजला 32 धावांवर शिवम मावीच्या द्वारे झेलबाद केले,ऋतुराजने 27 चेंडूत 32 धावा करताना तीन चौकार आणि एक शानदार षटकार मारला.
त्याच्या जागी पहिल्या कॉलीफाय सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणारा रॉबिन उथप्पा आला. त्याने जम बसलेल्या डूप्लेसीला चांगली साथ दिली,यामुळे दुप्लेसीने आयपीएल मधले 22 वे तर या हंगामातले 6 वे अर्धशतक केवळ 35 चेंडूतच नोंदवले ज्यामध्ये 5 चौकार आणि दोन षटकार सामील होते, त्याच्या धडाक्यामुळेच चेन्नईने केवळ 11 षटकातच आपल्या 100 धावा पूर्ण केल्या.आणि दुसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी सुद्धा,जी केवळ 26 चेंडूत आली होती.यामुळे केकेआरच्या अडचणी वाढतील असे वाटत असतानाच सुनील पुन्हा एकदा नारायणासारखा धावून आला आणि त्याने धोकादायक ठरत असलेल्या रॉबिनला 31 धावांवर पायचीत केले, रोबिनने केवळ 15 चेंडूत या धावा चोपताना 3 षटकार खेचले होते.यावेळी चेन्नईच्या 13 षटकातच 123 धावा झाल्या होत्या.
त्यानंतर आला मोईन अली. धोनीचे निर्णय नेहमीच अनाकलनीय असतात, त्याने हे कित्येकदा सिद्ध केलेले आहे, त्याने या संपूर्ण स्पर्धेत मोईन अलीला वारंवार फलंदाजीसाठी प्रमोट केले आहे आणि मोईन अलीने आपल्या कर्णधाराला फारसे निराशही केले नाही, आजही मोईन जबरदस्त फलंदाजी केली.त्याने केवळ 20 चेंडूत नाबाद 37 धावा ठोकल्या ज्यात तीन षटकार आणि दोन चौकार होते.
कार्तिकने दिलेल्या जीवदानाचा जबरदस्त फायदा उठवून डूप्लेसीने केकेआरच्या जखमेवर मीठ चोळत थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 86 धावा काढल्या ज्या केवळ 56 चेंडूत आल्या.यामुळेच चेन्नईने आपल्या निर्धारित 20 षटकात 192 धावा काढून केकेआर समोर फार मोठे लक्ष ठेवून आपल्या चौथ्या विजेतेपदाचा दावा मजबूत केला.
केकेआर कडून सुनील नारायण सोडला तर इतर कुठल्याही गोलंदजाला चेन्नईचा धडाका रोखता आला नाही.