IPL 2021: बातमी आयपीएलची – मॅक्सवेल आणि एबीने काढले कोलकाताचे घामटे!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मॅक्सवेल आणि एबीने चौकार षटकारांची जोरदार आतिषबाजी करीत कोलकाता नाईट रायडर्सचे अक्षरश: घामटे काढले.

ते आले, ते टिकले आणि ते असे टिकले की मग टीव्हीपुढे बसलेल्या असंख्य रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेले आणि सोबतच कोलकाता नाईट रायडर्स संघांचे घामटे काढून गेले. या धक्क्यातून  कोलकाता संघ सावरलाच नाही आणि तब्बल 38 धावांनी विजय मिळवत आरसीबीने रॉयल विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक ही पूर्ण केली.

चेपॉकच्या मैदानावर आज कोहलीने नाणेफेक जिंकली आणि कित्येक सामन्यानंतर जिंकलेल्या नाणेफेकीच्या आनंदात प्रथम फलंदाजी घेतली की तो त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता, त्यालाच माहिती, पण त्याने ताबडतोब फलंदाजी स्वीकारली आणि  देवदत्त पडीकलच्या सोबतीने सलामीला सुद्धा आला. पण तो आजही काही विशेष चमक दाखवू शकला नाही आणि केवल पाच धावा काढून तंबूत परतला सुद्धा. पाठोपाठच रजत पाटीदार कर्णधाराचा आदर्श घेत अवघ्या दोन धावा काढून आलो चिकूभाई म्हणून कंपनी तंबूत ही देऊ लागला.

नऊ धावात दोन गडी बाद अशी अवस्था नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर झाली की कोणीही अस्वस्थ होईलच.

पण यानंतर मैदानावर आला तो ग्लेन मॅक्सवेल  बऱ्यापैकी भरात असलेल्या मॅक्सवेलने तिसऱ्या विकेटसाठी  89 धावांची भागीदारी नोंदवली. अर्थात त्यात मॅक्सवेलचाच वाटा मॅक्स होता, बऱ्यापैकी भागीदारी फुलत असतानाच पडीकल वैयक्तिक 25 धावा करून बाद झाला आणि यानंतर आला तो म्हणजे अब्राहम डीविलीयर्स उर्फ ए बी.

ही आक्रमक जोडी बघता बघता आपल्या नैसर्गिक रंगात आणि ढंगात आली आणि मग रसिकांना मिळाला तो डोळ्याचे पारणे फेडणारा स्वर्गीय आनंद

एकापेक्षा एक की तू सरस की मी सरस अशी चुरस या दोन जागतिक फलंदाजामध्ये चालली आहे, असे वाटावे अशीच धुंवाधार फलंदाजी त्यांनी केली आणि इंग्लंड संघाला पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवून देणारा आयन मॉर्गन सुद्धा गोंधळून गेला.

बघताबघता मॅक्सवेलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो कदाचित आज आपले पहिले शतक करेल असे वाटत असताना तो आक्रमकतेच्या नादात आपल्याच देशबांधवाच्या पॅट कमिन्सच्या एका आखूड टप्प्यावर झेलबाद झाला पण त्याने त्याआधी जो रिव्हर्स स्वीप वर उत्तुंग षटकार मारला होता ना तो अहाहा असाच होता.

फक्त 49 चेंडूत 78 धावा करताना त्याने 9 चौकार आणि तीन डोळ्याचे पारणे फेडणारे षटकार मारले.यानंतरची सूत्रे आपल्या हातात घेत एबीने शेवटच्या काही षटकात तुफानी फलंदाजी करून कोलकाता संघाला मानसिक खच्ची तर केलेच  पण फक्त 34 चेंडूत नाबाद 76 धावाही काढल्या ज्यात त्यानेही 9 चौकार आणि तीन षटकार मारले पण त्याचे इथे वर्णन वाचण्यापेक्षा ते डोळ्यांनी बघणेच जास्त आंनददायी असते.

निर्धारित 20 षटकात रॉयल चॅलेंजर्सने 204 चे विशालकाय लक्ष कोलकातापुढे ठेवले, कोलकाता तर्फे फक्त वरूण चक्रवर्तीच जरा बरा गोलंदाज ठरला पण त्याचेही विश्लेषण एबी ने बिघडवले.

एवढे मोठे लक्ष डोळ्यासमोर असल्यावर सलामी आश्वासक व्हायला हवी असते पण नितीश राणा आणि शुभमन गील या कसोटीवर यशस्वी ठरले नाही आणि ना आयन मॉर्गन सुद्धा.आंद्रे रसेल काही तरी चमत्कार करेल अशी आशा कोलकाता समर्थक बाळगून होते पण आभाळ फाटल्यावर ठिगळ तरी किती लावावे अशी त्याची गत झाली होती, ना त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळाली ना कुठलीही त्याच्याबरोबर भागीदारी फुलली.

अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघ 20 षटकांत केवळ 166 धावाच काढू शकला आणि विराटच्या संघाची 38 धावांनी तिसऱ्या सामन्यातली तिसऱ्या लागोपाठ विजयाची गुढी रोवून गेला.

रॉयल बेंगलोरतर्फे  जेम्मीसनने तीन गडी बाद केले तर त्याला चहल आणि हर्षल पटेलने दोन दोन गडी मिळवत मस्त साथ दिली.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या विराटला आत्तापर्यंत तरी आयपीएल मध्ये विजेतेपद मिळवता आले नसले तरी यावेळी मात्र त्याच्या संघाची विजयी घोडदौड चालूच आहे आणि ती तशीच चालू राहावी अशी आशा त्याचे चाहते बाळगत असतील, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.