IPL 2021: बातमी आयपीएलची – मुंबईने दिल्लीत पाडला राजस्थानचा फडशा !

डीकॉकला सापडला योग्य वेळी फॉर्म

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आजच्या डबल धमाकाच्या पहिल्या दिल्ली येथे झालेल्या सामन्यात मुंबई संघाने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट्स आणि 9 चेंडू राखत मात केली आणि सहा गुण मिळवून अंकतालिकेतल्या चौथ्या क्रमांकावर पाऊल टाकले.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आक्रमक जोस बटलर सोबत युवा यशस्वी जैस्वालने कसलेही दडपण ने घेता सुंदर फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 7.4 षटकातच 66 धावांची जोरदार सलामी दिली.

केवळ 32 चेंडूत आक्रमक 42 धावा काढणाऱ्या बटलरने तीन चौकार आणि तीन षटकार मारले,पण अर्धशतक जवळ आल्यावर तो राहुल चहरला आपली विकेट देऊन बसला.यशस्वी जैस्वालने सुद्धा 20 चेंडूत 32 धावा काढून बाद झाला.

यानंतर आलेल्या संजू सॅमसनने आपल्या लौकीकाला जागत चांगली खेळी केली खरी पण तो ही जम बसलेला असताना बटलर इतक्याच धावा काढून बाद झाला.पण त्याने शिवम दुबे सोबत संघाला जवळपास दीडशे पर्यत पोहचवले होते.अखेरच्या षटकात बुमराह पुढे राजस्थान रॉयल्सच्या मिलर आणि रियान परागने खेळून संघाला आपल्या निर्धारित 20 षटकात 171 ही सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

मुंबईतर्फे आज बुमराहने 4 षटकात केवळ 15 च धावा देत कोहलीला येत्या विश्वचषकासाठी मी तयार आहे, असाच जणू संदेश दिला.तर राहुल चहरने सुद्धा दोन बळी घेत चांगली साथ दिली.

172 धावांचा पाठलाग करताना रोहित आज विशेष चमक दाखवू शकला नाही आणि केवळ 17 धावा काढून तो बाद झाला. पण त्याचा जोडीदार आणि यास्पर्धेत आतापर्यंत विशेष कामगिरी न करू शकलेला डीकॉक मात्र आज जबरदस्त खेळी करत होता.त्याच्या अपयशामुळे रोहितवर होणाऱ्या टीकेला उत्तर देत आणि रोहीतच्या विश्वासाला खरे ठरवणारी विजयी खेळी तो आज खेळत होता.

सूर्यकुमार यादव सुद्धा आज लवकरच बाद झाला आणि रोहितने चक्क कृणाल पंड्याला बढती देत सर्वानाच एक आश्चर्याचा धक्का दिला.पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत कृणाल पंड्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजावर आक्रमण करत 26 चेंडूत 2 चौकार आणि दोन षटकार मारत 39 धावा केल्या.

विजय जवळ आल्यानंतर तो बाद झाला आणि विजयाची औपचारिकता पोलार्डने धुमधडाक्यात पूर्ण केली.

डीकॉकने आक्रमक आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचा सुंदर मिलाफ करत 50 चेंडूत नाबाद 70 धावा करताना संघाला विजय मिळवून देत आपला डंका वाजवला. त्याच्या या विजयी खेळीने त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या विजयामुळे मुंबई संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला तर राजस्थान रॉयल्सला पुढची वाट बिकट असल्याचे संकेत देऊन गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.