IPL 2021 : गोष्ट आयपीएलची – अखेर कोरोनाने घेतला आयपीएलचा बळी !

आयपीएल स्पर्धा रोखली गेली , बीसीसीआयला आली जाग

0

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – सोन्याचे अंडे देणारी आयपीएल अखेर आज पुढील काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. जगभर थैमान घालणाऱ्या करोनाने आधी आपला दंश स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सुद्धा मारला होताच, पण सर्व कळत असूनही ही अमाप पैसा देणारी स्पर्धा थांबवण्यासाठी कोणीही तयार नव्हते. पण काल कोलकाता संघाच्या टीममधल्या खेळाडूंना लागण झाली आणि मग आज अचानक ही स्पर्धा पुढील काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेत आज तशी औपचारिक घोषणा सुद्धा करण्यात आली.

मुळात ही स्पर्धा आता भरवायला हवी होतीच का असे प्रश्न विचारण्यात येत होते,मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) या स्पर्धेद्वारे 428 कोटी रुपये मिळाले असे म्हणतात. खेळाडूंना कोटीचे कोटी उड्डाणे, वैयक्तिक घसघशीत बक्षिसे, वाहिन्यांना प्रसारणाचे तगडे मानधन यामुळे ही स्पर्धा होवू नये, असे कोणालाही वाटणार नाही. ‘सबसे बडा रुप्पया’ ही म्हण प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेच.

भारतासारख्या मोठ्या देशात प्रतिभेची कमतरता मुळीच नाही. मात्र, अनेक प्रतिभावंत खेळाडू राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकत नाहीत, यामागे अनेक कारणे आहेत, कोटा सिस्टम याचे या अनेकांमधले एक मुख्य कारण. अशा कारणामुळे ज्यांना प्रतिभा असूनही पुढे जाता येत नाही अशा अनेकांना या स्पर्धेने अलीबाबासारखे श्रीमंत केले.

_MPC_DIR_MPU_II

वानगीदाखल एकच नाव सांगतो, प्रवीण तांबे या खेळाडूला वयाच्या चाळीशीनंतर या स्पर्धेत खेळायला मिळाले. आयुष्यभर रणजी खेळून सुद्धा त्याला जे मिळाले नाही ते या स्पर्धेने त्याला दिले, अशी अनेक उदाहरणे आहेत. काही कोच झाले काही मेंटर्स झाले काही समोलोचक! (आकाश चोप्रा किती लोकांना त्याच्या फलंदाजीसाठी आठवतोय?)

त्यामुळे थोडक्यात काय तर ही स्पर्धा नाही तर सोन्याची अनेक अंडी देणारी कोंबडी आहे आणि ही स्पर्धा भरवणारे चुकातून शहाणे झालेले असल्याने ती त्या कथेतील शेतकऱ्यासारखे चुका करणारे नक्कीच नाहीत.त्यामुळे ही स्पर्धा संभाव्य सर्व धोके कळत असूनही कोणालाही ती थांबवावी, असे वाटत नव्हते.

पण जेव्हा घरातच आग लागली तेंव्हा पैशापेक्षाही महत्वाचा आपला जीव आहे, हे कटू सत्य उमगल्यानं अनेक खेळाडूंना ही स्पर्धा सोडावी वाटू लागली, यात सातासमुद्रापलीकडून आलेल्यानी आघाडी घेतली आणि काल जेंव्हा कोलकाता संघाचा सामना थांबवला गेला तेंव्हा मग नाईलाजाने म्हणा, शहाणपण आल्याने म्हणा वा काहीही म्हणा पण ही स्पर्धा स्थगित करत ती पुन्हा विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर घेऊ, असे जाहीर करण्यात आले.

विविध माध्यमातून या निर्णयाला अनेक मार्गांनी झोडपून काढण्यात आले. काहींनी स्वागत सुद्धा केले असेल, पण खरेच प्रश्न असा आहे की, सर्व कळत असूनही पुढे असे होऊ शकते याची संपूर्ण कल्पना असूनही एवढा अट्टाहास केवळ भरमसाठ पैसा मिळतोय म्हणून अनेकांच्या जिवाचा धोका पत्करणे कितपत योग्य होते?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment