IPL 2022 CSK Vs GT : चेन्नईवर दणदणीत विजय मिळवून गुजरात टायटनने प्ले ऑफ मधला प्रवेश करत अंतीम चार मध्ये मिळवले नंबर 1 स्थान

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटनने पदार्पणातल्या स्पर्धेतच प्ले ऑफ मध्ये प्रवेश करत सर्वाधिक विजयासह अंतीम चार संघातला एक संघ म्हणूनही आणि एक नंबरचा संघ म्हणूनही संस्मरणीय कामगिरी करत आपले आयपीएल पदार्पण खऱ्या अर्थाने गाजवले आहे. आज त्यानी बलाढ्य आणि चार वेळेसच्या विजेत्या चेन्नई संघाला आणखी एक दणदणीत पराभव करताना 7 गडी राखून मोठा विजय मिळवला आहे.

टाटा आयपीएल 2022 मधल्या आजच्या 62व्या सामन्याला मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरुवात झाली ज्यामधे हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन संघाने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करताना त्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीस मिळवल्या आहेत.

आज चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यांना आपल्या निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून फक्त 133 धावाच करता आल्या. चेन्नईची सुरुवात आज अतिशय खराब अशी झाली, खतरनाक फलंदाज डेविड कॉन्व्हे आज फक्त 5 च धावा करून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर साहाच्या हातात झेल देवून तंबूत परतला तेंव्हा चेन्नईच्या नावावर 13 चेंडूत फक्त 8 धावा दिसत होत्या.

त्यानंतर मात्र मोईन अली आणि सलामीवीर ऋतूराज गायकवाड यांनी दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची अर्धशतकी भागीदारी करुन बऱ्यापैकी डाव सावरला. दोघेही चांगले खेळत आहेत असे वाटत असताना मोईन अली वैयक्तिक 21 धावा करुन साईकिशोरच्या गोलंदाजीवर बाद झाला.यानंतरही जगदिशन आणि ऋतुराजने आणखी 48 धावांची चांगली भागीदारी करत मोठया धावसंख्येचे संकेतही दिले.

ऋतुराजने आज आपले 9 वे आयपीएल अर्धशतकही पूर्ण केले, मात्र अर्धशतक झाल्यानंतर त्यात फक्त 3 धावा जोडून तो रशीद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला,यानंतर शिवम दुबे,आणि धोनी संघासाठी फारसे योगदान न देता बाद झाले आणि चेन्नई संघ पुरता अडचणीत आला,पण आपल्या 5 व्याच सामन्यात खेळत असलेल्या जगदीशनने या दडपणाखाली झुंजार खेळत नाबाद 39 धावा करत चेन्नईला 133 धावांची माफक पण झुंजण्याइतकी धावसंख्या गाठून दिली. गुजरात संघाकडून शमीने 2 तर जोसेफ, रशीद आणि साईकिशोरने प्रत्येकी एकेक गडी बाद करत चेन्नईच्या डावाला स्थैर्य येऊ दिले नाहीच.

120 चेंडूत 134 धावा गुजरात संघासाठी कधीही मोठे आव्हान वाटले नाही त्यातच वृद्धीमान साहा आणि शुभमन गीलने 43 चेंडूत 59 धावांची दणकेबाज सुरुवात करून देत हे आव्हान मोठे नाहीच याचा संकेतही दिला. चांगले खेळत असताना शुभमन गील पुन्हा एकदा मोठी पारी खेळण्याची संधी गमावून बसला. त्याने 18 धावा काढताना 3 चौकार मारले. त्याच्या जागी आलेल्या मॅथ्यू वेडने साहा बरोबर पुढे खेळताना आणखी 41 धावांची चांगली भागीदारी करून विजय आणखीनच जवळ आणला.

वेडने 15 चेंडूत वेगवान 20 धावा केल्या.मात्र तो आणि हार्दिक पंड्याही थोड्याफार फरकाने बाद झाल्यानंतरही गुजरात टायटन संघाची धावसंख्या 13.1 षटकात 3 बाद 100 अशी समाधानकारक आणि आश्वासकही होती,यावेळी गुजरात संघाला 41 चेंडूत केवळ 34 धावाच हव्या होत्या, त्या वृद्धीमान आणि मिलरने 5 चेंडू आणि 7 गडी राखून सहज साध्य केल्या आणि संघाला 7 गडी राखुन मोठा विजय मिळवून दिला.

साहाने आपल्या चांगल्या फॉर्मचा अचूक आणि योग्य फायदा उठवून आपले आणखी एक अर्धशतक पूर्ण करत या विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 57 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत बहुमूल्य नाबाद 67 धावा केल्या, त्याला मिलरने नाबाद 15 धावा करत चांगली साथ दिली.चेन्नई कडून पथीरानाने सर्वाधिक दोन गडी बाद केले.या विजयासह गुजरात टायटनने सर्वाधिक विजय मिळवत आपले प्ले ऑफ मधले स्थानही पक्के केले आणि नंबर 1 ही मिळवून आपले नाणे खणखणीतरित्या वाजवले आहे, तर चेन्नईच्या मात्र या निराशाजनक पराभवाने उरल्यासूरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

  • चेन्नई सुपर किंग्ज – 5 बाद 133,  ऋतुराज 53,मोईन 21, धोनी 7 एन जगदीशन नाबाद 39, शमी 19/2, जोसेफ 15/1, खान 31/1, पराभूत विरुद्ध
  • गुजरात टायटन –  19.1 षटकात 3 बाद 137, गील 18,मिलर 15, वेड 20,साहा नाबाद 67, परथिना 24/2,मोईन अली 11/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.