IPL 2022 Final : नवोदित गुजरात टायटन ठरला टाटा आयपीएल 2022 चा विजेता

कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगीरी ठरली विजयात अतिशय मोलाची

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – राजस्थान रॉयल्सवर साखळी स्पर्धेतल्या सामन्यात  गाजवलेले वर्चस्व गुजरात संघाने तसेच शेवटपर्यंत (IPL 2022 Final) कायम ठेवले आणि नाणेफेक हारल्यानंतरही आधी गोलंदाजी करत राजस्थानला फक्त 130 धावात रोखून  विजयाकडे पहिले पाऊल टाकले आणि नंतर त्या मामुली लक्ष्याचा पाठलाग करताना 7 गडी आणि 11 चेंडू राखत सहजपणे विजयास गाठले आणि याचसोबत आपल्या पहिल्याच स्पर्धेत खेळताना विजेतेपद मिळवून नवा इतिहासही रचला.

बटलर सह सर्वच प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि गुजरात संघाच्या सर्व गोलंदाजांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी यामुळे (IPL 2022 Final) राजस्थान रॉयल्सला गुजरात संघाने गुढग्यावर बसवले आणि केवळ 130 धावात रोखून अर्धी बाजी मारली होती. त्यामुळेच त्यांच्या आपल्या आतापर्यंतच्या दमदार कामगिरीला लखलखते सोनेरी कोंदण देण्यासाठी 120 चेंडूत फक्त 131 धावा करण्याचे तुटपुंजे आव्हान होते.

जे गुजरातने 18.1 षटकात आणि फक्त 3 गडी गमावून सहजपणे गाठले आणि राजस्थान रॉयल्सवर संपूर्णपणे वर्चस्व गाजवत नवा इतिहासही रचला. गुजरात टायटनमुळे आयपीएलला तब्बल 5 वर्षानंतर नवा विजेता मिळाला आहे.

आपल्या पदार्पणातल्या स्पर्धेत थेट अंतीम फेरी गाठून सर्वाना प्रभावीत करणारा हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन जिंकणार की 2008 साली ही स्पर्धा जिंकलेले राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकून आपल्या माजी कर्णधार आणि जगातल्या सर्वोत्तम फिरकीच्या जादूगाराला श्रद्धांजली अर्पण करणार या उत्सुकतेने टाटा आयपीएल 2022 चा आजचा अंतिम फेरीचा आणि पंधराव्या विजेतेपदासाठीची औत्सुकपूर्ण लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवली गेली.

त्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजूने आजच्या सामन्यात बंगलोरवर दणदणीत विजय मिळवणारा संघच कायम ठेवला तर हार्दिक पंड्याने अल्झारी जोसेफच्या जागेवर लॉकी फर्ग्युसनला संघात स्थान देण्याचा एकमेव बदल केला.

साखळी स्पर्धेत 14 पैकी 10 सामने जिंकून अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात 37 धावांनी तर पहिल्या कॉलीफायर सामन्यात 7 गडी राखून पराभूत केले होते. या धर्तीवर गुजरातचे राजस्थान रॉयल्सवर बऱ्यापैकी मानसिक दडपण होते खरे पण टी-20 काय किंवा एकंदरीतच क्रिकेटमधे भूतकाळापेक्षा  वर्तमानाला जास्त महत्व असते.

त्यामुळे या दोन्ही पराभवाची सव्याज परतफेड करत राजस्थान रॉयल्स बाजी मारणार की आपल्या विजयी अभियानाला अभेद्य ठेवत गुजरात ही स्पर्धा संस्मरणीय करणार याची उत्सुकता तमाम आयपीएल क्रिकेट रसिकांना आज होती.

824 धावांसह 4 शतके करुन ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या बटलर तर 26 विकेटस मिळवून पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या राजस्थान रॉयल्सकडे कर्णधार संजू, देवदत्त पडीकल, युवा यशस्वी जैस्वालसह अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, हेटमायर, रियान पराग, असे खतरनाक खेळाडू तर ट्रेंट बोल्ट, कृष्णा असे आग ओकणारे गोलंदाज होते.

गुजरात संघाकडे गील, साहा, तेवतीया सह स्वतः हार्दिक पंड्या, शमी, मिलर, रशीद खान असे एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्याने हा सामना अतिशय रंगतदार होईल अशी अपेक्षा सर्वानाच होती. मात्र गुजरात संघाने या मोठ्या सामन्यात अप्रतिम खेळ  करत राजस्थान रॉयल्सवर संपूर्णपणे वर्चस्व गाजवत एकतर्फी  विजय मिळवला.

युवा प्रतिभावंत यशस्वी आणि या स्पर्धेवर आतापर्यंत आपले अधिराज्य करणारा जॉस बटलरने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली तर गुजरात टायटन संघाकडून मोहम्मद शमीने आपले आक्रमण सुरू केले.पहिले षटक अप्रतिम फेकताना मोहम्मद शमीने फक्त 2 धावा दिल्या.

यानंतर मात्र यशस्वी जैस्वालने जबरदस्त आक्रमक होत काही आकर्षक फटके मारत सुरुवात बरी करत आशा दाखवली पण हीच अतिआक्रमकता त्याला नडली आणि एक अतिशय देखणा षटकार मारल्यानंतरही दुसरा तसाच षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि यश दयालने त्याची 22 धावांची छोटी पण स्फोटक खेळी संपवली. त्याने 16 चेंडूत 2 षटकार मारत या धावा केल्या.

त्याच्या जागी आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने बटलरला साथ देताना सावधगिरीने सुरुवात केली,पण पहिल्या पॉवरप्लेवर गुजरात टायटनचाच वरचष्मा राहिला आणि तो शेवटपर्यंतही राहिला. त्यांच्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सला पहिल्या षटकात 1 गडी गमावून 44 धावाच करता आल्या.

त्यानंतरही संजूला आपल्या किर्तीला साजेसा खेळ करता आला नाही तो नाहीच,त्यामुळेच त्याच्यावर दडपण आले आणि ते झुगारून देण्याच्या नादात तो आपली विकेट गुजरातच्या कर्णधाराला देवून तंबूत परतला यावेळी राजस्थान रॉयल्सची धावसंख्या 8.2 षटकात 2 बाद 60 अशी होती.

अशीच दमदार कामगिरी करत गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर दडपण कायम ठेवले,ज्यामुळे पहिले दहा षटके संपल्यावरही राजस्थानला दोन गडी गमावून फक्त 71 च धावा करता आल्या.त्याच्या जागी आलेल्या देवदत्त पडीकलला आजही विशेष काहीही करता आले नाही.

आणि दहा चेंडूत फक्त 2 धाव करुन तो रशीद खानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या हातात झेल देवून बाद झाला आणि 12 व्या षटकानंतरही राजस्थानची धावसंख्या 3 बाद 79 अशी नाजूक होती आणि यावेळीही गुजरातचेच पारडे वरचढ दिसत होते.आणि यावर कडी केली ती कर्णधार पंड्याने,तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने जम बसलेल्या बटलरला बाद करून राजस्थान संघाच्या उरल्यासुरल्या आशाआकांक्षाही जवळजवळ खतम केल्या.

बटलरने 35 चेंडू खेळूनही फक्त 39 धावाच केल्या.या विकेटसच्या पतनाने राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित  फलंदाजांना आलेले दडपण झुगारून देता आले नाही ते नाहीच,त्यामुळे राजस्थान रॉयल्सला आपल्या निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून फक्त 130  धावाच करता आल्या.

गुजरात संघाकडून पंड्याने कर्णधार म्हणून आघाडीवर राहत करीयर बेस्ट गोलंदाजी करत 17 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी घेतले. त्याला साई किशोरने दोन तर रशीद, शमी, दयालने एकेक गडी बाद करत उत्तम साथ दिली, त्यामुळेच राजस्थान रॉयल्सला फक्त 130 धावांची तुटपुंजी धावसंख्या उभारता आली.

गुजरात संघाची आजवरची या स्पर्धेतली कामगिरी बघता आणि त्यांच्या फलंदाजीतली खोली बघता 120 चेंडूत 131 धावांचे आव्हान फार मोठे वाटत नव्हतेच,पण तरीही क्रिकेटमध्ये कधीही काहीही होवू शकते याची जाण असलेल्या क्रिकेट रसिकांना मात्र या सामन्यातही तसाच काही चमत्कार होईल का याची उत्सुकता होतीच.

गुजरात टायटनच्या डावाची सुरुवात गील आणि साहा जोडीने तर हे आव्हान रोखण्यासाठी ट्रेंट बोल्टने राजस्थानच्या आक्रमणाची सुरुवात केली, पहिल्याच षटकात चहलने गीलचा एक सोपा झेल सोडल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एका अप्रतिम चेंडूवर साहाला त्रिफळाचित करुन राजस्थानला पहीले यश मिळवून दिले आणि हा सामना रंगतदार होईल याचे संकेतही दिले.त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडला ट्रेंट बोल्टने वैयक्तिक 8 धावावर परागच्या हातुन झेलबाद करुन गुजरात संघाची अवस्था 4.3 षटकानंतर 2 बाद 23 अशी करून पुन्हा एकदा सामन्यात रंग भरले.

वेड बाद झाल्यानंतर आला तो कर्णधार पंड्या. 2022 च्या टाटा आयपीएलने नव्या हार्दिक पंड्याला जगासमोर आणले आहे, तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होताच, पण त्याच्या अष्टपैलूत्वाला या स्पर्धेने खणखणीतरित्या सिद्ध केले आहे,यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब करण्यासाठी त्याला संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर शेवटपर्यंत थांबणे गरजेचे होते.

एकदा का तो स्थिरावला की कितीही मोठे आव्हान मामुली ठरते याची जाणीव त्याच्या बॅटला असतेच,त्यात हे आव्हान कितीही नाही म्हटले तरी नक्कीच मुश्कील नव्हते.मात्र राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांनी केलेल्या चुका टाळत दमदार कामगिरी केली, त्यामुळे पहिल्या 10 षटकात गुजरात संघाला दोन गडी गमावून फक्त 54 धावाच करता आल्या.

कमी धावसंख्येचे सामने बऱ्याचदा रोमहर्षक होतात असे म्हटले जाते, मात्र यावर्षी तरी मिडास स्पर्श लाभलेल्या हार्दिक पंड्याच्या मनात तसले काहीही नव्हते, त्यातच राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षकांनीही खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे या जोडीने 46 चेंडूतच नाबाद 52 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत विजयाकडे दमदार पाऊल टाकले.

या  भागीदारीमुळे गुजरातला विजयासाठी अखेरच्या 48 चेंडूत फक्त 58 धावा हव्या होत्या, आणि पंड्याला तितकीच तोलामोलाची साथ देत दुसऱ्या बाजूने शुभमन गीलही चांगले खेळत होता.यावेळी गुजरात संघ अगदी सहज जिंकेल असे वाटत असतानाच यजुर्वेद्र चहलने एका अप्रतिम चेंडूवर हार्दिक पंड्याची 34 धावांची चिवट खेळी संपवून आपला 27 वा बळी मिळवून पर्पल कॅप आपल्या नावावर करत हसरंगाला मागे सोडले.

चहलची ही सर्वोत्तम कामगिरी असून त्याचे असे भरात येणे भारतीय संघासाठीही खूप आनंदी बातमी आहे, त्याच्या जागी आला तो खतरनाक डेविड मिलर, यावेळी गुजरात संघाला 33 चेंडूत 40 धावा हव्या होत्या.मात्र मिलरने आपल्या चिरपरिचित अंदाजात  खेळत पुन्हा एकदा सर्वच गोलंदाजांवर हल्लाबोल करत  आणखी एक दणदणीत विजय मिळवून देताना अजिंक्यपदही मिळवून दिले.

मिलरने केवळ 19 चेंडूत नाबाद 32 धावा चोपताना 3 चौकार आणि एक षटकार मारला, तर त्याला तितकीच तोलामोलाची साथ देताना शुभमन गीलने नाबाद 45 धावा केल्या. या स्पर्धेचे पहीले विजेते असलेल्या राजस्थान रॉयल्सला नेमके महत्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावण्यात आलेले अपयश त्यांच्या 15 व्या हंगामातल्या चमकदार कामगिरीला विजेतेपद मिळवून देवू शकले नाही.त्यांच्यासाठी समाधानाची बाब हीच राहिली की पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचे मानकरी असलेले दोन्ही खेळाडू त्यांच्या संघातलेच होते.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 9 बाद 130
बटलर 39, जैस्वाल 22, संजू 14, हेटमायर 11, पराग 15
पंड्या 17/3, साईकिशोर 20/2, दयाल 18/1, खान 18/1
फॉल ऑफ विकेट्स 1/31, 2/60, 3/79, 4/79, 5/94, 6/98, 7/112, 8/130, 9/130

पराभूत विरुद्ध
गुजरात टायटन 18.1 षटकात 3 बाद 133
वेड 8, साहा 5, पंड्या 34, गील नाबाद 45, मिलर नाबाद 32
बोल्ट 14/1,चहल 20/1, कृष्णा 40/1
फॉल्स ऑफ विकेट्स
1 बाद 9, 2 बाद 23, 3 बाद 86

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.