IPL 2022 GT Vs RCB : कोहलीची दमदार खेळी; 8 गडी राखून बंगलोर संघाकडून गुजरात टायटनचा दणदणीत पराभव

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – बंगलोर संघाने महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावत अप्रतिम सांघिक खेळ करत या स्पर्धेत नंबर वन क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटनला प्रथम 168 धावात रोखले आणि नंतर या छोट्या लक्ष्याचा विजयी पाठलाग आरामात करताना 8 गडी आणि 8 चेंडू राखत दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाने आपल्या प्ले ऑफ मध्ये जाण्याची आशाही जिवंत ठेऊन खणखणीत कामगिरी केली. आपल्या चिरपरिचित अंदाजात खूप दिवसांनंतर एक चांगली खेळी करणारा कोहली आणि त्याला तितकीच तोलामोलाची साथ देणारा मॅक्सवेल आणि कर्णधार डूप्लेसी या विजयाचे मानकरी ठरले.

आपल्या दमदार कामगिरीने प्ले ऑफ मध्ये आपली जागा या सामन्याआधीच पक्की करणाऱ्या गुजरात टायटन आणि त्या जागेसाठी अजूनही तळ्यात मळ्यात असल्याने धडपडणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघातला टाटा आयपीएल 2022 मधला आजचा 67 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला गेला. ज्यात गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वृद्धीमान साहा आणि शुभमन गीलने गुजरातच्या डावाची सुरुवात केली, पण शुभमन गील आजही अपयशी ठरला.

दर्जेदार खेळाडू असूनही फलंदाजीत सातत्य नसणे त्याचे हे नकोसे वैशिष्ट्य आजही अधोरेखित झाले. त्याला हेजलवूडने फक्त एक धावावर तंबूत परत पाठवून गुजरात संघाला पहिला धक्का दिल. त्यानंतर साहा आणि मॅथ्यू वेडने पुढे खेळताना दुसऱ्या गडयासाठी 17 च धावा जोडल्या असताना मॅथ्यू वेड सुद्धा फक्त 16 धावा करून मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि गुजरात संघाला दुसरा मोठा धक्का बसला. यानंतर आलेल्या कर्णधार पंड्याने साहासोबत पुढे खेळायला सुरूवात केली आणि तिसऱ्या गड्यासाठी फक्त 24 धावा जोडल्या.

एका बाजूने चांगले खेळत असलेल्या साहाची छोटी पण आक्रमक खेळी डूप्लेसीच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे संपुष्टात आली आणि गुजरात संघ चांगलाच अडचणीत आला. साहाने केवळ 22 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकार मारत 31 धावा केल्या, तो बाद झाला. तेव्हा गुजरात टायटनची धावसंख्या 8.3 षटकात 3 बाद 62 अशी बिकट झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पंड्याचा निर्णय चुकला की काय अशी शंकाही वाटायला लागली होती.

मात्र या कठीण परिस्थितीत कर्णधार पंड्याने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेत कर्णधार कसा असावा याचे सुंदर प्रात्यक्षिक देत मिलर सोबत चौथ्या गडयासाठी 61 धावांची चांगली भागीदारी करत डाव सावरला. या अर्धशतकी भागीदारीने गुजरात टायटनच्या डावाला बऱ्यापैकी आकार आला, मात्र ही भागीदारी फोडली ती हसरंगाने. त्याने आपल्याच गोलंदाजीवर जम बसलेल्या मिलरचा झेल घेत ही भागीदारी फोडून आपल्या संघाला चौथे यश मिळवून दिले. मिलरने 25 चेंडूत 3 षटकार मारत 34 धावा केल्या. मात्र तो चांगला स्थिर झाल्यानंतर बाद झाल्याने संघाला मोठ्या धावसंख्यकडे जाणे अवघड होऊन बसले.

तो बाद झाल्यानंतर आलेला आक्रमक तेवतीया आज मात्र फार काही चमत्कारी खेळ करू शकला नाही आणि केवळ 2 धावा काढून हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि गुजरातची अवस्था 18 व्या षटकात 5 बाद 132 अशी झाली होती, पण यानंतरही हार्दिक पंड्याने कठीण समयी अप्रतिम खेळत आपले 8 वे अर्धंशतक पूर्ण करत संघाला सावरण्यात मोठा वाटा उचलला.

त्याने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.त्याला रशीद खाननेही नेहमी प्रमाणे आक्रमक खेळत चांगली साथ देत 6 चेंडूत नाबाद 19 धावा करत चांगली साथ दिली ज्यामुळे गुजरात टायटनला आपल्या निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 168 धावा करता आल्या आणि बंगलोर पुढे 169 धावांचे रॉयल चॅलेंजही ठेवता आले. आरसीबी साठी हेजलवूडने चांगली गोलंदाजी करत 39 धावा देत दोन गडी बाद केले, ज्यातले 17 शेवटच्या षटकात आले तर हसरंगाने आज चहलला मागे टाकत घेतलेल्या एका विकेटने पर्पल कॅपचा मान मिळवला.

(24 प्रत्येकी)या आव्हानाचा पाठलाग करताना आणि आपले प्ले ऑफ मधले स्थान पक्के करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 120 चेंडूत 169 धावा हव्या होत्या. त्यासाठी चांगली सुरुवात अपेक्षित होती आणि तीच करुन दिली. कर्णधार डुप्लेसी आणि विराट कोहलीने, त्यांनी बंगलोरसाठी या हंगामातली सर्वोत्तम सलामी देत या आव्हानाचा पाठलाग करायला सुरुवात केली. दोघेही चांगले आणि आत्मविश्वासाने खेळत होते. खास करुन विराट कोहली, ज्या क्षणाची अपेक्षा ,चातकासारखी वाट पाहत असलेल्या त्याच्या असंख्य जगभराले चाहते पाहत होते तो क्षण आज याची देही याच डोळा बघण्याची अनुभूती आज आली.

त्याने बघताबघता आपले अर्धशतक आज गाठले. त्यासाठी त्याने फक्त 34 चेंडू घेतले. त्यापेक्षाही मोठी बातमी ही होती की आज तो त्याच्या त्याच चिरपरिचित अंदाजात खेळत होता. तो फॉर्मात येणे हे फक्त आरसीबीसाठीच नाही तर भारतीय क्रिकेट आणि होय,जागतिक क्रिकेटसाठीही फार मोठी बाब आहे. या धडाक्याने आरसीबीने आपल्या 12 षटकातच 100 धावा पूर्ण करुन आणखी एक मोठे आणि दमदार पाऊल विजयाकडे टाकले. ही आरसीबीसाठी या मोसमातली पहिली शतकी सलामी भागीदारी ठरली.

ही जोडी पंड्याची डोकेदुखी वाढवत असतानाच डूप्लेसीची 44 धावांची खेळी रशीद खानने समाप्त करुन आपल्या संघाला पहीले यश मिळवून दिले. पंड्याने त्याचा आयपीएल मधला 100 वा झेल डूप्लेसीच्या नावाने आपल्या नावावर केला. डूप्लेसीने 38 चेंडूत 5 चौकार मारत या बहुमुल्य 44 धावा करताना कोहलीसोबत पहिल्या गड्यासाठी 115 धावांची दमदार भागीदारी करुन बंगलोरच्या विजयाचा पाया रोवला. या चांगल्या सुरूवातीचा फायदा उठवत तिसऱ्या नंबरवर आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत उचलला,मात्र आज उत्तम खेळत असलेल्या कोहलीच्या खेळीचा अंत रशीद खानने एका अप्रतिम चेंडूंवर केला आणि मॅथ्यू वेडने त्याला यष्टीचीत करत एकच जल्लोष केला.

कोहलीने 54 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार मारत अतिशय किंमती अशा 73 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या 17 व्या षटकात 2 बाद 146 अशी होती. त्यानंतर मॅक्सवेलने घणाघाती खेळत केवळ 18 चेंडुत नाबाद 40 धावा करत आपल्या संघाला 8 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला आहे आणि याचबरोबर प्ले ऑफ मध्ये खेळण्याची आशाही या विजयाने जिवंत ठेवली आहे.

अर्थात गुजरातला मात्र या पराभवाने फारसा फरक पडला नाही आणि ते 10 सामने जिंकून 20 गुणासह अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर आजही विराजमान आहेत आणि त्यांच्या प्रथम क्रमांकाला यापुढेही फारसा धोका असेल असे चित्र आतातरी दिसत नाही.या आयपीएल मध्ये केवळ दोन आणि तेही गुजरात संघाविरुद्धच अर्धशतक करणाऱ्या कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • गुजरात टायटन – 20 षटकात 5 बाद 168, साहा 31,वेड 16,मिलर 34, हार्दिक पंड्या नाबाद 62, रशीद खान नाबाद 19, मॅक्सवेल 28/1,हसरंगा 25/1, हेजलवूड 39/2, पराभूत विरुद्ध
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 18.4 षटकात 2 बाद 170,  कोहली 73, डूप्लेसी 44, मॅक्सवेल नाबाद 40, खान रशीद 32/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.