IPL 2023-दिल्लीने पंजाब किंग्जला पराभूत करत वाढवल्या अडचणी

आता पंजाब किंग्जला पुढील दोन्हीही सामन्यात मोठा विजय आवश्यक.

एमपीएससी न्यूज:(विवेक कुलकर्णी)दिल्लीने पंजाब किंग्जला अडचणीत आणत मिळवला 15 धावांनी विजय.
हिंदीमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे ,’हम तो डुबे है सनम,तुमको भी ले डूबेंगे’याचा पुरेपूर प्रत्यय देत दिल्ली कॅपिटल्स संघाने काल पंजाब किंग्जला पराभूत केले.शिखर धवनचे अनाकलनीय निर्णय, ऐन मोक्याच्या क्षणी दिलेल्या अनावश्यक धावा अन नंतर पाठलाग करताना केलेली कचखाऊ फलंदाजी यामुळे पंजाब किंग्जला 15 धावांनी पराभूत व्हावे लागले. या विजयाने दिल्ली संघाला काहीही(2 अंक सोडले तर)विशेष फायदा झाला नसला तरीही या पराभवाने पंजाब संघाला मात्र नक्कीच अडचणीत आणले असून त्यांना आता उर्वरित सामने तेही मोठ्या फरकाने जिंकावेच लागतील ,अन्यथा त्यांचा या आयपीएल मधला प्रवास नक्कीच समाप्त होईल. एकंदरीत गुजरात अन काही अंशी चेन्नई सोडले तर पुढील तिन्हीही स्थानासाठी प्रचंड स्पर्धा असल्याने या आयपीएलची रंगत चांगलीच वाढली(IPL 2023) आहे.

Rte Pune : पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेला 25 मे पासून होणार सुरुवात

काल धर्मशाला येथे झालेल्या 16 व्या सीझनमधल्या 64 व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल शिखर धवनच्या बाजूने लागला,अन त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

याचाच फायदा उचलत दिल्लीचा कर्णधार वॉर्नर आणि 5 सामने बाहेर बसल्यानंतर पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ या जोडीने जबरदस्त फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 63 चेंडूत 90 धावांची जोरदार सलामी रचत संघाला झकास सुरुवात करून दिली.वॉर्नर आपल्या अर्धशतकाजवळ आलेला असताना 46 धावांवर असताना सॅम करनच्या गोलंदाजीवर धवनच्या हातात झेल देवून बाद झाला.यानंतर थोड्याच वेळातरिसो सोबत वेगवान अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीही आपले अर्धशतक पूर्ण करून करनच्याच गोलंदाजीवर बाद झाला, त्याने 54 धावा केल्या.यानंतर मात्र पंजाबी गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही, रायले रिसोने तोडफोड अंदाजात स्फोटक फलंदाजी करत केवळ 37 चेंडूत 6 चौकार आणि तितकेच उत्तुंग षटकार मारत नाबाद 82 धावा करत दिल्ली संघाला 200च्याही पुढे नेववून ठेवले,त्याला सॉल्टनेही 14 चेंडूत नाबाद 26 धावा करत चांगली साथ दिली. या खतरनाक फलंदाजीमुळे कर्णधार धवन चांगलाच गडबडून गेला आणि त्याने 20 वे षटक अर्शदीपला न देता स्पिन गोलंदाजी करणाऱ्या हरप्रित ब्रारला दिले ज्यात रिसो आणि सॉल्टने 23 धावा कुटल्या, ज्या विजयातले आणि पराभवातले मुख्य अंतर(IPL 2023) ठरल्या.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवातही अतिशय खराब झाली.कर्णधार धवन भोपळा न फोडताच इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला,पण त्यानंतर मात्र प्रभसिमरन आणि अथर्व तायडे या जोडीने प्रगल्भता दाखवत दुसऱ्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करुन डाव बऱ्यापैकी सावरला,पण याचवेळी प्रभसिमरन सिंग वैयक्तिक 22 धावांवर असताना अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.यानंतर मात्र लियाम लिविंगस्टोन आणि तायडेची जोडी चांगलीच जमली, यांनी 78 धावांची चांगली भागीदारी करुन पंजाब संघाला विजयाकडे अग्रेसर केलेच होते की अथर्व तायडेला पायात गोळे आल्याने निवृत्त व्हावे लागले, तो 55 धावांवर असताना नाईलाजाने निवृत्त झाला अन पंजाब संघाची रुळावर आलेली गाडी पुन्हा एकदा पटरीवरुन सटकली.जितेश शर्मा, सॅम करन, हरप्रित ब्रार संघासाठी फारसे योगदान न देताच तंबूत परतले, अन पंजाब संघ विजय मिळवणार नाही हे स्पष्ट झाले,नाही म्हणायला लिविंगस्टोनने जबरदस्त फटकेबाजी करत प्रयत्नांची पराकाष्ठा केली ,पण तो संघाला विजयी करण्यात अन आपले शतक पूर्ण करण्यातही अपयशी ठरला. त्याने 94 धावांची जबरदस्त खेळी केली,पण ती दुर्दैवाने वांझोटीच ठरली.अनुभवी इशांत शर्माने अखेरच्या षटकात विजयाससाठी आवश्यक असलेल्या धावा लिविंगस्टोनला काढू न दिल्याने पंजाब संघाला 15 धावांनी पराभूत व्हावे लागले.

रिसोला सामन्याचा मानकरी म्हणून त्याच्या झंजावाती खेळीच बक्षीस (IPL 2023)मिळाले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स
2 बाद 213
वॉर्नर 46,शॉ 54,रिसो नाबाद 82,सॉल्ट नाबाद 26
करन 32/2

विजयी विरुद्ध

पंजाब किंग्ज
8 बाद 198
प्रभसिमरन 22,तायडे निवृत्त 54,करन 11,लिविंगस्टोन 94
इशांत शर्मा 36/2,नोरजे 36/2,अक्षर पटेल 27/1

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.