IPL 2023 : सुपर किंग्जचा सुपर कुल कर्णधार धोनीच्या अप्रतिम नेतृत्वामुळे सीएसके दहाव्यांदा अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : गतविजेत्या गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत करत सीएसकेने आयपीएलच्या अंतिम फेरीत दहाव्यांदा प्रवेश करत महेंद्रसिंग धोनीने आपली कदाचित शेवटची आयपीएल स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल टाकत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.दमदार अर्धशतक करत आपल्या संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या ऋतूराज गायकवाडला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात(IPL 2023) आले.

बहुप्रतिक्षित आयपीएल सुरू झाले अन बघता बघता आता त्याचा अंतिम फेरीचा प्रवास पण सुरु झाला. अनेक रोमहर्षक सामने जिंकत चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले, त्यातल्या पहिल्या दोन संघातला पहिला क्वाॅलिफायर 1 चा सामना आज चार वेळेसच्या विजेत्या महेंद्रसिंग धोनीची  सीएसके विरुद्ध गतविजेत्या हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स या दोन संघात चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर झाला. ज्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.या सामन्यात 15 धावांनी रोमांचक विजय मिळवत सीएसकेने संघ अंतीम फेरीत प्रवेश करत आपल्या पाचव्या विजेतेपदाकडे दमदार पाऊल टाकले(IPL2023) आहे.

या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतूराज गायकवाड आणि डेव्होन कॉन्व्हे या जोडीने चेन्नईच्या डावाची सुरुवात केली.ऋतूराजला नेहमीच भारतीय क्रिकेटचे भवितव्य म्हणून बघितले जाते. त्याच्या खेळाचा दर्जा,त्याची फटक्याची निवड,त्यातली टायमिंग, त्यामागे असलेली ताकत त्याला आयपीएल मध्ये तरी नक्कीच यशस्वी करत आलेली आहे. त्याला आता मुख्य संघातही पुरेपूर संधी मिळायला हवी. आजही त्याने जोरदार सुरुवात केली.त्यामानाने कॉन्व्हेची बॅट जरा शांतच होती.

तरीही या जोडीने पहिल्या पॉवरप्ले अखेर 49 धावांची नाबाद सलामी देत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.यात ऋतूराजचा वाटा 33 चा होता तर कॉन्व्हेने 14 धावा काढल्या होत्या.बघताबघता ऋतूराजने आपले या आयपीएलमधले चौथे अर्धशतक पूर्ण करत या महत्वाच्या सामन्यात संघासाठी शानदार योगदानही दिले.तो सेट झालाय असे वाटत असतानाच तो मोहीत शर्माच्या गोलंदाजीवर 60 धावा काढून बाद झाला.यानंतर आलेला शिवम दुबेही आज विशेष काही खास योगदान न देता केवळ 1 धाव काढून नूर अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

यावेळी चेन्नईच्या धावसंख्या12 व्या षटकात 2 बाद 90 अशी होती.यानंतर कॉन्व्हेला साथ द्यायला आला तो अजिंक्य रहाणे.त्याने कॉन्व्हेला साथ देत डाव सावरलाय असे वाटत असतानाच तो दर्शन नाळकुंडेच्या गोलंदाजीवर शुभमन गीलच्या हातात झेल देवून बाद झाला. रहाणेने 17 धावा केल्या.त्यानंतरच्या दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर कॉन्व्हेही 40 धावा करुन बाद झाला आणि सीएसके संघ एकदम अडचणीत आला. 16 व्या षटकात त्यांच्या 4 बाद 125 धावा फलकावर दिसत होत्या, या कठीण परिस्थितीत जडेजा आणि अंबाती रायडू मैदानावर होते.या जोडीने नेटाने खिंड लढवायला सुरुवात केली खरी पण जिद्दी राशीद खानने आपल्या शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर रायडूला बाद करत या सामन्यातला पहिला आणि या मोसमातला 25 वा बळी नोंदवला.

यानंतर खेळायला आला तो चेन्नईसह जगभरच्या प्रेक्षकांचा लाडका माही.मात्र तो आला न थोड्याच वेळात तंबूत परतल्यावर मैदानावर सुनसान शांतता निर्माण झाली होती, पण जडेजा आणि मोईन अलीने फटकेबाजी करत संघाला 172 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

या धावसंख्येचा पाठलाग करताना शुभमन गील आणि साहाने गुजरातच्या डावाची सुरुवात केली,पण साहासाठी हा सामनाही कुछ खास नही रहा,बरा खेळतोय तो असे वाटत असतानाच साहा 12 धावा करून दीपक चाहरची पहिली शिकार ठरला. यानंतर गीलला साथ द्यायला आला तो कर्णधार पंड्या. पण तो ही  फक्त 8 धावा करुन जडेजाच्या हातात झेल देवून तिक्षणाची शिकार झाला अन सामना रंगतदार होणार याची खात्री पटायला लागली.

गुजरात संघाला काळजी करण्याची गरज नव्हती ,कारण त्यांचा शुभमन गील अजूनही मैदानावर होता ,त्याला साथ द्यायला दाशुन शनाका आला,ही जोडी डाव सावरत आहे असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने शनाकाला चकवत आपला आयपीएल मधला 150 वा बळी मिळवून गुजरात टायटन्सला खिंडीत पकडले. यावेळी गुजरात टायटन्सची धावसंख्या 11 व्या षटकात 3 बाद 72 अशी होती. यानंतर गीलला साथ द्यायला आला तो डेविड मिलर.

या फॉरमॅटमध्ये किलर मिलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिलरची डाळ आज जडेजाने शिजू दिली नाही, त्याला केवळ 4 धावावर बाद करुन जडेजा माहीचा का मोस्ट फेवोरीट सर जडेजा आहे ते सिद्ध केले.मिलरच्या बाद झाल्यानंतर गीलवर गेलेला कॅमेरा या विकेटचे महत्व काय ते गीलचा चेहरा स्पष्ट सांगून गेला होता.कदाचित हेच दडपण गेल्या कित्येक वर्षांत आंतरराष्ट्रीय सामान्य लीलया पेलणाऱ्या गीलला झेपले नाही अन पुढच्याच षटकात तो दीपक चाहरच्या गोलंदाजीवर कॉन्व्हेच्या हातात झेल देऊन वैयक्तिक 42 धावा काढून बाद होताच चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर एकच जल्लोष साजरा होवू लागला.

यावेळी चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात वरचढ आहे हे जाणवत होते.फक्त चेन्नईच्या विजयात एकच अडथळा दिसत होता, तो म्हणजे करामती रशीद खान.पण इथं धोनीचे नेतृत्वकौशल्य का खास आहे हे कळते आणि पटतेही.धोनीने आपला सर्व अनुभव पणाला लावत आणि नेहमीप्रमाणे बुद्धासम डोके शांत ठेवत अफलातून आपल्या मर्यादित अनुनभवी गोलंदाजी अनुभवी गोलंदाजांनाही लाजवेल अशीच सिद्ध करून दाखवताना राशीद खानला तुषार देशपांडेच्या हातुन बाद करत सामन्यात संपूर्ण वरचष्मा मिळवला.उरलेली औपचारिकता पूर्ण करत सीएसकेने गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत करत दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत धोनी आणि  आयपीएलचे नाते किती मजबूत आहे हे सप्रमाण सिद्ध केले.

Pune : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; एकावर प्राणघातक हल्ला

या विजयाने माहीचा संघ थेट अंतीम फेरीत दाखल झाला असला तरी हार्दिक पांड्यासाठी अजूनही एक संधी असणार आहे,उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स मधला जो विजेता असेल त्याच्यासोबत दोन हात करण्याची संधी त्याला आहेच, त्यातल्या विजेत्यांना पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत तो दाखल होवून माहीला आजच्या पराभवाचे उत्तर देवू शकतो, अर्थात ही शक्यता आहे,ती खरी होईल की खतरनाक मुंबई इंडियन्स मिळालेल्या संधीचे सोने करणार हे येत्या दोनच (IPL2023)दिवसात कळेल.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज
7 बाद 172
ऋतूराज 60,रहाणे 17,कॉन्व्हे 40 ,जडेजा 22,मोईन नाबाद 9
शमी 28/2,मोहित 31/2,नूर 29/1
विजयी विरुद्ध
गुजरात टायटन्स
सर्वबाद 157
गील 42,साहा 12,राशीद 30,विजयशंकर 14
जडेजा  18/2,चाहर 29/2,तिक्षणा 28/2,पथीराना 37/2

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.