IPL 2023-गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर नमवत सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन

जडेजाने अविस्मरणीय कामगिरी करत संघाला मिळवून दिला एक रोमहर्षक विजय.

एमपीएससी न्यूज(विवेक दिगंबरराव कुलकर्णी): महेंद्रसिंग धोनीच्या लाडक्या जडेजामुळे सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन्स ठरला.शेवटच्या चेंडूवर अविश्वसनिय चौकार मारून जडेजा अन सीएसकेने गुजरात संघाला नमवले. अंतिम सामन्याचा असली रोमांच म्हणजे काय हे आजच्या सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात तमाम क्रिकेटरसिकांना याची देही याच डोळा अनुभवता आले.अतीशय थरारक सामन्यात रवींद्र जडेजाने आपल्या संघाला एक रोमहर्षक विजय मिळवून देताना माहीच्या सीएसके संघाला पाचव्यांदा जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा (IPL2023) उचलला.

Pimpri : …म्हणून शहरात दोन तास वीजेचे भारनियमन

आयपीएल 2023 च्या जेतेपदाच्या लढतीतल्या अंतिम फेरीच्या सामन्यात नाणेफेक सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.शुभमन गील आणि वृद्धीमान साहा या जोडीने जबरदस्त सुरुवात करुन देताना पहिल्या पॉवरप्ले अखेर नाबाद 62 धावांची खणखणीत सलामी दिली.

अतिशय जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुभमन गीलने आजही तडाखेबंद फलंदाजी करत सीएसकेच्या गोलंदाजी विस्कळीत केली,यामुळे कधी नव्हे ते सीएसके संघ गडबडून गेला असे वाटत होते. एकदोन सोपे चान्स गीलला बाद करायचे त्यांच्या हातून सुटले, एकदा तर चक्क जडेजा कडूनही संधी हुकली, पण मग एमएसने 20 वर्षाच्या तरुणांच्या चपळाईने गीलला यष्टीचित करत संघाला पहिले पण अतिशय मोठे यश मिळवून दिले.

यावेळी गोलंदाजीची कमान धोनीचे हुकुमी अस्त्र म्हणजेच जडेजा सांभाळत होता.शुभमनने 20 चेंडूत 7 चौकार मारत 39 धावा केल्या. तो जबरदस्त लयीत दिसत होता. पण जडेजा आणि धोनीच्या प्लॅनमुळे सीएसकेला हे मोठे यश मिळाले. यानंतर खेळायला आला तो साई सुदर्शन. या विकेटनंतर गुजरात टायटन्सच्या धावांचा ओघ काहीसा कमी झाला. पहिल्या 10 षटकात त्यांच्या नावावर 86 धावा दिसत होत्या.विशेष बाब म्हणजे सीएसकेच्या गोलंदाजांनी गीलच्या तडाख्यातही एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती, की वाईड,नो बॉल फेकला होता.

साहजिकच एक बळी गेल्यानंतर गुजरात टायटन्स मजबूत अन मोठ्या धावसंख्येकडे जात आहे असे वाटत असतानाच त्यांच्या धावगतीला काहीसा ब्रेक लागला. या संकटातही साहाने सुंदर फलंदाजी करत या महत्वाच्या सामन्यात शानदार खेळी करत आपले या मोसमातले दुसरे अर्धशतक पुर्ण करुन संघाला बऱ्यापैकी आश्वस्त केले.त्याला युवा साई सुदर्शनही दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होता. मधेच निसर्ग आपले अस्तित्वही जाणवून देत असल्याने हा महत्वाचा सामना होईल की नाही अशी आशंका अधूनमधून येत (IPL2023) होती.

गुजरात संघाची त्याचदृष्टीने धावगती वाढवावी अशीच मनोधारणा होती .पण खेळपट्टी काहीशी फलंदाजांना प्रतिकूल ठरायला लागली होती. याच  दडपणाखाली आक्रमक फटका मारण्याची चूक साहाला नडली आणि हा बळीही धोनीच्याच नावावर गेला.दीपक चाहरच्या अखेरच्या षटकातल्या अखेरच्या चेंडूवर साहा 54 धावा काढून  धोनीच्या हातात झेल देवून तंबूत परतला.

त्याने 39 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार मारत या धावा काढल्या.यानंतर साईला साथ द्यायला आला तो कर्णधार पांड्या, युवा साई सुदर्शनने जबरदस्त टेम्परामेन्ट दाखवत आपले तिसरे अर्धशतक पूर्ण करताना संघाला मोठी धावसंख्या गाठणे अशक्य नाही असाच संदेश दिला.आणि यामुळेच गुजरात संघाचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला.साईने आपले अर्धशतक पुर्ण झाल्यावर जबरदस्त आक्रमण करत संघाला 200 चा टप्पा तर गाठून दिलाच. पण आपले वैयक्तिक शतक ही त्याने टप्प्यात आणले.

तो शतक पुर्ण करेल असे वाटत असतानाच  पथीरानाच्या गोलंदजीवर तो 96 धावा करुन बाद झाला. त्याचे शतक हुकले असले तरीही ही खेळी शतकाइतकीच किंबहुना त्याहूनही मौल्यवान नक्कीच होती.त्याने केवळ 47 चेंडूत 8 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार मारत या धावा केल्या. त्याच्या खेळीमुळेच गुजरात टायटन्सने आपल्या 20 षटकात 4 बाद 214 धावा करुन चेन्नई सुपर किंग्ज पुढे मोठे आव्हान ठेवले.

पहिल्या दहा षटकात 86 धावा केलेल्या गुजरात टायटन्सने नंतरच्या दहा षटकात 128 धावा ठोकून जबरदस्त वापसी करत अर्धी बाजी तरी नक्कीच मारली होती कारण हे आतापर्यंतच्या आयपीएल फायनल मधले सर्वात मोठे आव्हान कुठल्याही संघाने याआधी तरी दिले नव्हते.याआधीचा अंतिम सामन्यातली सर्वोच्च  धावसंख्या 208 होती, जी सनरायजर्स हैदराबादने आरसीबी विरुद्ध 2016 साली रचली(IPL2023) होती.

आयपीएल च्या या आधीच्या 15 मोसमात फक्त एकदाच 200 हून अधिक धावांचा पाठलाग झाला होता. त्यामुळे गुजरात संघ आपले दुसरे जेतेपद सहज गाठेल अशीच परिस्थिती वाटत होती. त्यांच्या गोलंदाजी बद्दल कधीही कोणालाही शंका नव्हतीच. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले तीनही गोलंदाज गुजरात टायटन्सचेच. शमी 28, राशीद 27 आणि मोहीत 25 बळी मिळवून विरोधी संघाला नेस्तनाबूत करतात . पण कदाचित आपली शेवटची आयपीएल (हो कदाचितच,कारण धोनीच्या मनातले कोणालाही कळत नाही )स्पर्धा खेळत असलेल्या लाडक्या माहीला ही स्पर्धा जिंकून देवून शानदार निरोप द्यावा, हे स्वप्न सीएसकेचेही असल्याने तेही हा सामना जिंकण्यासाठी जिवाची बाजी लावतील, ही खात्री असल्याने हा सामना रंगतदार होईल(IPL2023) असे वाटत होते.

युवा ऋतूराज आणि आक्रमक डेविड कॉन्व्हे या जोडीने चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात केली. तर गुजरात संघाकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीची सुरुवात केली.पहिले 2 चेंडू ऑन टार्गेट पडल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ऋतूराजने खणखणीत चौकार मारला अन लगेचच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

दोन अडीच तास खेळाचा खेळखंडोबा झाला .अन 12.10 मिनिटांनी खेळ सुरु झाला.  यावेळी समीकरण बदलले होते. डकवर्थ लुईस नुसार सीएसकेला आता 15 षटकात 171 धावा विजयासाठी हव्या होत्या. ऋतूराज आणि कॉन्व्हे या जोडीने सकारात्मक आणि आक्रमकही सुरुवात करत केवळ 24 चेंडूतच 52 धावांची सलामी देत शानदार सुरुवात करुन दिली.

जशी अपेक्षित होती अगदी तशीच सुरुवात या जोडीने करुन देत संघाला विजयाची आशाही दाखवली.या दणकेबाज सुरुवातीमुळे चेन्नई एक्सप्रेसला आपला मार्ग सापडलाय असे वाटत असतानाच सामन्यातले 7 वे षटक एकदम सनसनाटी ठरले. राशीद खान जरी आपल्या पहिल्या षटकात यश मिळवून देवू शकण्यात यशस्वी ठरला नसला तरी त्याचा जोडीदार नूर अहमदने एकाच षटकात आधी ऋतूराज अन मग कॉन्व्हेला बाद करुन सामन्याचा  नूरच बदलून टाकला.

यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या जोडीने प्रगल्भता दाखवत डाव सावरला, आणि अपेक्षित धावगतीही राखून विजयाची आशा कायम ठेवली.  रहाणेने दोन सलग आणि अप्रतिम षटकार मारत संघाला विजयाच्या समीप आणले. पण नेमके याच वेळी रहाणे 13 चेंडूत वेगवान 27 धावा करुन बाद झाला.

त्यानंतर आलेल्या आणि या सामन्याआधीच आपली निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायडूने 8 चेंडूत वेगवान 19 धावा काढून सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूने झुकवला. पण याच षटकात मोहीत शर्माने त्याला अन धोनीला सलग दोन चेंडूंवर बाद करुन सामन्यात सनसनाटी निर्माण केली. यावेळी गुजरात संघाचा विजय स्पष्ट दिसत होता.

पण सीएसके साठी अजूनही विजयाचा विश्वास कायम होता कारण मैदानात होते कुठल्याही बॉलला कुठेही भिरकावून देवू शकणारे शिवम दुबे आणि जडेजा अखेरच्या षटकात 13 धावा हव्या असताना पहिल्या चार चेंडूवर 3 च धावा आल्या तेंव्हा गुजरात संघाच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा करायला सुरुवात केलीच होती की जडेजाने 5 व्या चेंडूंवर सणसणीत षटकार मारत अखेरच्या चेंडूवर चार धावा असे समीकरण आणून ठेवले.

खरे तर या परिस्थितीतही गुजरात संघच विजयाजवळ वाटत होता. पण आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करणाऱ्या मोहीतचा अखेरचा चेंडू अतिशय खराब पडला. ज्याचा सर जडेजाने खरपूस समाचार घेत लेग स्वीप मारत चौकार वसूल केला अन संघाला पाच गडी राखून पाचव्यांदा चॅम्पियन बनवले.

गुजरात संघाला मात्र हातातोंडाशी आलेला विजय पराभवात रूपांतरीत झाल्यामुळे प्रचंड निराशा वाटयाला आली. हे सत्य असले तरी हा सामना खऱ्या अर्थाने अंतिम सामन्याला साजेसा झाल्याने सच्चा क्रिकेटरसिक आनंदाने न्हाऊन गेला,हे ही निखालस सत्य.शुभमन  गील ऑरेंज कॅपचा तर मोहम्मद शमी पर्पल कॅपचा मानकरी (IPL 2023)ठरला. तर धडाकेबाज 47 धावा काढून सीएसकेच्या विजयाचा पाया रचणाऱ्या देवोन कॉन्व्हेला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स
4 बाद 214
गील 39,साहा 54 ,साई 96,पांड्या नाबाद 21.
जडेजा 38/1,चाहर 38/1,पथीराना 44/2
पराभूत विरुद्ध
चेन्नई सुपर किंग्ज
5 बाद 171
ऋतूराज 26,कॉन्व्हे 47,रहाणे 27,रायडू 19,दुबे नाबाद 32,जडेजा नाबाद 15
मोहित 36/3,नूर 17/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.