IPL2023-गीलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत.

एमपीएससी न्यूज- (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – युवा पण प्रतिभावंत फलंदाज शुभमन गीलच्या जबरदस्त खेळीमुळे आधी गुजरात ने बलाढय मुंबई संघापुढे मोठी धावसंख्या रचून विजयाचा पाया रचला अन त्या धावसंख्येचा गोलंदाजांनी पुरेपूर बचाव करत मुंबई इंडियन्सला तब्बल 62 धावांनी मात देत सलग दुसऱ्या वर्षीही अंतिम फेरीत धडक मारत आपल्या दुसऱ्या जेतेपदाकडेही दमदार पाऊल टाकले(IPL 2023) आहे.

अंतीम फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या या सामन्यात सुरुवातीला पावसामुळे रंगाचा बेरंग होईल का असे वाटले पण केवळ अर्धा तास उशीर झाल्याने उपस्थित क्रिकेटरसिक त्यालाही आनंदाने दाद देवू लागले.

अहमदाबादच्या नरेंद मोदी मैदानावर झालेल्या आजच्या या कॉलिफायर 2 च्या सामन्यात रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत गुजरात टायटन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले.मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात ऋत्विक शौकीनच्या जागी कुमार कार्तिकेयला,तर गुजरात टायटन्सने शनाका आणि नाळकुंडेला बाहेर बसवत साई सुदर्शन आणि जॉश लिटलला अंतीम अकरात स्थान दिले.

शुभमन गील आणि वृद्धीमान साहा यांनी गुजरात टायटन्सच्या आक्रमणाची सुरुवात केली तर मुंबई इंडियन्ससाठी जेसन बेहरनडॉफने गोलंदाजीची कमान सांभाळताना पहिले षटक टाकताना फक्त 3 धावा देत चांगली सुरुवातही करून दिली.यानंतर मात्र गील साहा जोडीने सावध पण शानदार सुरुवात करून देताना पहिल्या पॉवरप्ले अखेर 50 धावांची नाबाद भागीदारीही केली.गील अप्रतिम खेळत होता, त्याला साहानेही आज चांगली साथ दिली, नशीबही गीलच्या बाजूने होते,जॉर्डनच्या गोलंदाजीवर टीम डेविडकडुन त्याला जीवदान मिळालेही,पण तो झेल खूपच अवघड होता.यानंतर मात्र लगेचच मुंबई इंडियन्सला मोठे यश मिळाले, या मोसमात सातत्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या चावलाने साहाला शानदार चकवत त्याला ईशान किशनच्या हातून यष्टीचित करत संघाला पहिले यश मिळवून दिले.

यानंतर खेळायला आला तो साई सुदर्शन. गीलला पुन्हा एकदा आठव्या षटकात आणखी एक जीवदान मिळाले, कुमार कार्तिकेयने त्याला आपल्या जाळ्यात फसवले होतेच,पण डीप मिड विकेटला असलेल्या क्षेत्ररक्षकाला तो झेल टिपता आला नाही, या दोन जीवदानाचा फायदा उचलत त्याने अगदी थोडयाच वेळात आपले या मोसमातले 5 वे अर्धशतक पूर्ण करुन मुंबई इंडियन्सच्या जखमेवर जणू मीठच चोळले. अर्धशतकानंतर मात्र तो एकदम चवताळून खेळायला लागला,केवळ षटकार आणि चौकाराच्या भाषेतच त्याची बॅट बोलत होती, त्याच्या काही षटकारांना पाहून तर भलेभले चकित झाले.

या तुफानी खेळीमुळे केवळ 45 चेंडूतच 93 धावांची दणदणीत भागीदारी आली, ज्यात सुदर्शनचा वाटा फक्त 27 च होता. आतापर्यंतच्या 16 वर्षाच्या इतिहासात आयपीएलमध्ये जे झाले नव्हते,ते आज होणार की याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती, गीलने प्ले ऑफ मध्ये शतक करून अशी खेळी करणारा सर्वात तरुण खेळाडू हा बहुमान पटकावला तर याचबरोबर एका सीझन मध्ये तिन शतक पूर्ण करून कोहली, बटलर सोबत इतिहास पुस्तकात आपले नावे लिहणार का याचीच. आणि त्याने ते करून दाखवलेच,आतापर्यंत षटकार,चौकाराची भाषा बोलणाऱ्या गीलने एक धाव घेत ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात यश तर मिळवलेच, पण याचसोबत त्याने 800 धावाही एका मोसमात पूर्ण करुन आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.

हे शतक फक्त 48 चेंडूत आले, ज्यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकार सामील होते. या फटकेबाजीमुळे गुजरात टायटन्स मोठ्या धावसंख्येकडे जाणार हे स्पष्ट दिसू लागले, अन त्याचमुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहीतचा निर्णय चुकला की काय असेही वाटू लागले.गीलचा धडाका शतक पूर्ण झाल्यानंतर आणखीनच तीव्र झाला,त्याने प्ले ऑफ मध्ये 123 धावा करून सेहवागचा 122 धावांचा विक्रम मोडून आपल्या नावावर नवा विक्रम केला.

त्याची आजची खेळी बघून तो बाद होणारच नाही असे वाटत असतानाच टीम डेविडने आकाश मढवालच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत ही विक्रमी खेळी समाप्त केली, योगायोग म्हणजे डेव्हिडकडूनच त्याचा झेल तो 20 धावावर असताना सुटला होता, त्याचाच फायदा उचलत गीलने 129 धावांची विक्रमी खेळी केली, या धावा फक्त 60 चेंडूत आल्या, ज्यात 7 चौकार आणि 10 षटकार सामील होते. याचदरम्यान मुंबई इंडियन्स साठी दोन काळजी वाढवणाऱ्या घटना घडल्या, क्षेत्ररक्षण चालू असताना ईशान, आणि रोहितला जखमी झाल्याने तंबूत जावे लागले. ही इंजूरी किरकोळ असावी अशीच मुंबई समर्थकांची इच्छा होती. तरीही मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 233 धावांवर रोखले असे म्हटले तर त्यात फारसे गैर ठरणार नाही, कारण एकवेळ गुजरात टायटन्स 250 च्या पुढे जाईल असे वाटत होते, तरीही गुजरात टायटन्सने कॉलीफायरच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाच.

Pimpri : ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल

या मोसमात चार वेळा 200 हुन अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करुन विक्रम रचणाऱ्या मुंबई इंडियन्सला सहाव्या विजेतेपदाकडे  जाण्यासाठीचे पाऊल टाकण्यासाठी 120 चेंडूत 234 धावा करण्याचे विशाल लक्ष्य पार करायचे होते.यातच मुंबईला ईशान किशन सलामीला येणार नाही हे कळताच आणखी एक धक्का बसला,त्याच्या जागी खेळायला आला तो नेहल वदेरा, त्याने जरी यास्पर्धेत याआधी आपले कौशल्य दाखवले होते, आज मात्र त्याला ते दाखवता आले नाही, एवढ्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना त्याला दडपण झेपले नाही अन तो शमीच्या गोलंदाजीवर साहाकडे झेल देवून फक्त 4 धावा काढून बाद झाला, यानंतर आलेल्या ग्रीनने शानदार चौकार मारत चांगली सुरुवात केली,पण त्यालाही एक चेंडू हाताला लागला अन जखमेने विव्हळत त्याने मैदान सोडताच मुंबईच्या गोटात सुनसान शांतता पसरली ,आणि यात भरच पडली जेव्हा कर्णधार रोहीतही केवळ 8 धावा काढून संघाला निराशेच्या खोल गर्तेत टाकून तंबूत परतला.

यावेळी मुंबई इंडियन्सची अवस्था 2 बाद 21 अशी बिकट झाली होती. यावेळी मैदानात उतरला तो स्काय उर्फ सुर्यकुमार आणि त्याला साथ द्यायला दुसऱ्या बाजूला होता तो युवा तिलक वर्मा. त्याने अनुभवी शमीच्या एका षटकात सलग चार चौकार मारत हम इतने आसानीसे हार माननेवाले नही असेच जणू सांगितले. 13 चेंडूत घणाघाती 43 धावा करुन तो संघाला सावरतोय असे वाटत असतानाच फिरकीचा जादुगार राशीद खानने त्याला आपल्या जादुई फिरकीवर चकवत त्रिफळाचित करुन आपला 25 वा बळी मिळवून आपला करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित केला.या विकेटने मुंबई इंडियन्सच्या आशेला मोठाच सुरंग लागला.

यानंतर मैदानात पुन्हा एकदा उतरला तो जिद्दी कॅमेरोन ग्रीन. त्याने आपली जखम विसरून संघाला संकटात बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, त्याने सुर्याबरोबर वेगवान 52 धावांची भागीदारी करुन संघाला आशा दाखवायला सुरुवात केलीच होती की जॉश लिटलने त्याला एका अप्रतिम यॉर्करवर बोल्ड करुन मुंबई संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला.ग्रीनने 20 चेंडूत 30 धावा केल्या.

आता मुंबई इंडियन्ससाठी एकमेव आशा होती ती म्हणजे सुर्यकुमारने पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवावा ही.त्यानेही संघाच्या हाकेला ओ देत बघताबघता आपले या मोसमातले 5 वे अर्धशतक पूर्ण करून संघाला पुन्हा एकदा आस दाखवायला सुरुवात केली. त्याला साथ द्यायला आला तो विष्णू विनोद.सुर्या तळपायला लागलाय असे वाटत असतानाच मोहीत शर्माने त्याला त्याच्या त्या चिरपरिचित शॉटवर फसवून त्रिफळाबाद केले , अन अहमदाबादच्या मैदानावर उपस्थित गुजरात समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी निराश होवून तंबूत परत जात असलेल्या सुर्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगून जात होते.याच षटकात मोहीतने विष्णूलाही बाद करून सामना पूर्णपणे गुजरात टायटन्सच्या बाजूने झुकवला.यानंतर मुंबई संघाच्या मोठ्या पराभवाची आणि गुजरात संघाच्या दणदणीत विजयाची औपचारिकताच(IPL 2023) बाकी होती

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर
येत्या 28 तारखेला आता चेन्नई संघाविरुद्ध गुजरात टायटन्सची जेतेपदासाठी लढत होईल, चेन्नई चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, महेंद्रसिंग धोनीची कदाचित ही शेवटची आयपीएल असल्याची शंका व्यक्त होत असल्याने आपल्या लाडक्या माहीला पाचव्या जेतेपदाची भेट देण्याचा चेन्नई संघाचा मानस असल्याने हा सामना अतिशय रंगतदार(IPL2023) होवू शकतो.

विक्रमी खेळी करणारा शुभमन गील सामन्याचा मानकरी ठरला.
गुजरात टायटन्स
2 बाद 233
गील 129,साहा 18,साईसुदर्शन निवृत्त 44
पंड्या नाबाद 28
मढवाल 52/1,चावला 45/1
विजयी विरुद्ध
मुंबई इंडियन्स
सर्वबाद 171
रोहित 8 ,तिलक 43,ग्रीन 30,सूर्यकुमार 61
राशीद 33/2,शमी 41/2,मोहित 10/5

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.