IPL 2023-मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर शानदार विजय

तरीही प्ले ऑफची जागा पक्की नाही.

एमपीएससी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : ग्रीनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आपला शेवट गोड करताना सनरायजर्स हैदराबादला 8 गडी आणि दोन षटके राखून पराभूत करताना आपल्या प्ले ऑफच्या आशा आणखीनच मजबूत केल्या आहेत,पण तरीही त्यांना आता शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत करावे म्हणून प्रार्थना(IPL 2023) करावी लागेल.

अडखळत सुरुवात करणे,आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे अशी टीका मुंबई इंडियन्सवर होत असली तरी आयपीएल स्पर्धा सर्वाधिक जिंकणारा आणि सर्वात लोकप्रिय असणारा संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स.

Hinjawadi : आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक

यावेळीही त्यांची सुरुवात अडखळत झाली, काही सामने ते सहज जिंकतील असे वाटत असतानाच ते पराभूत झाले.त्यामुळेच यावर्षी त्यांची गाडी तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे. आजची संधी त्यांच्यासाठी शेवटची होती,सामना तर जिंकावाच लागणार पण त्याचसोबत त्यांना आरसीबीचेही रॉयल चॅलेंजही होते.

या सर्व पार्श्वभूमीवर साखळी फेरीतला त्यांचा अखेरचा सामना आज सनरायजर्स हैदराबाद संघासोबत  खेळवला गेला,ज्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आपले ध्येय पाठलाग करुन सामना जिंकण्याचे (जी मुंबई इंडियन्सची ताकतही आहे) असल्याचे जणू दाखवले.

सनरायजर्स हैदराबाद संघाच्या डावाची सुरुवात मयंक आगरवाल आणि विवरांत शर्मा या जोडीने केली.पहिल्या पॉवरप्ले अखेर या जोडीने नाबाद 53 धावा काढत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली.दोघेही मुंबईच्या गोलंदाजीचा समर्थ सामना करत होते, अर्थात एक दोन चुका मुंबईच्या क्षेत्ररक्षकांकडूनही झाल्या.त्याचाच फायदा उचलत या जोडीने नाबाद अर्धशतकी सलामी दिली.मुंबई संघाची फलंदाजी बलाढ्य असली तरी त्यांची गोलंदाजी म्हणावी तितकी धारदार या मोसमात तरी दिसली नाही .

आजही तसेच काहीसे जाणवले, म्हणूनच कदाचित या जोडीने पहिले 10 षटके खेळून काढत आपल्या विकेट सांभाळून ठेवत 93 धावा काढल्या. विवरांत या युवा फलंदाजाने पहिल्यांदाच सलामीला येत नाबाद अर्धशतक करत या मर्यादा आणखीनच स्पष्ट केल्या असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही.

Nigdi : पीएमपीएलच्या निगडी बस स्थानकावरील रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा

शर्माने केवळ 36 चेंडूत अर्धशतकी खेळी करताना 7 चौकार आणि एक षटकार मारला.या आत्मविश्वासामुळेच या जोडीने या मोसमातली पहिली शतकी सलामीही दिली.विवरांतची फलंदाजी बघून मयंकला आत्मविश्वास आला आणि त्याने या मोसमातले पहिले आणि आयपीएलमधले 13 वे अर्धशतक पूर्ण केले.ही जोडी फेविकोलच्या जोडसारखी टिकली होती आणि त्याचबरोबर ते दोघेही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर चांगलेच आक्रमणही करत होते.

अखेर आकाश मढवालने विवरांतला 69 धावांवर बाद करून 14 व्या षटकात संघाला पहिले यश मिळवून दिले. यावेळी सनरायजर्स हैदराबादची धावसंख्या 1 बाद 140 अशी होती.यानंतर हैदराबादच्या डावाची 37 चेंडू बाकी होते, साहजिकच त्यांच्या 220 च्या आसपास जाण्याची शक्यता ठळकपणे जाणवत होती.

आपल्या अर्धशतकानंतर मयंक जास्तच आक्रमक खेळू लागला,त्याने काही देखणे फटके मारत आपल्या शतकाकडे वाटचाल सुरू केलीच होती की मढवालनेच त्यालाही 83 धावांवर बाद करुन त्याची खेळी समाप्त केली.या धावा त्याने केवळ 46 चेंडूत केल्या ज्यात 8 चौकार आणि चार उत्तुंग षटकार सामील होते.

या विकेटनंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने सनरायजर्स हैदराबादला आपल्या 20 षटकात 5 बाद 200धावा करता आल्या, हे मुंबईच्या गोलंदाजांचे यश होते. मुंबईच्या आकाश मढवालने अप्रतिम गोलंदाजी करत सर्वाधिक चार बळी मिळवले, यातले दोन तर सलग दोन चेंडूवर त्याने टिपले.

एकवेळ सनरायजर्स 220 च्या आसपास सहज जाईल असे वाटत असतानाच मुंबई इंडियन्सने त्यांना 200 धावांवर रोखण्यात मोठे यश मिळवले.या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली,ईशान किशनने धडाकेबाज सुरुवात केली खरी पण अतिआक्रमकतेच्या नादात तो डावाच्या तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरला  एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला.त्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या.

यानंतर थोड्याच वेळात रोहितलाही एक मोठे जीवदान मिळाले नाही तर मुंबई इंडियन्सचा पाय आणखीनच खोलात गेला असता,पण त्यानंतर आलेल्या ग्रीनने मात्र अतिशय बेधडक फलंदाजी करत रोहितला काही अंशी दिलासा दिला.ग्रीनने षटकार चौकाराची बरसात करत धावसंख्या हालती  ठेवली, त्याने केवळ 20 च चेंडूत आपले या मोसमातले आणखी एक (एकूण तिसरे)अर्धशतक पूर्ण करताना चार चौकार आणि 5 उत्तुंग षटकार मारले.

त्याची ही खेळी बघून रोहीतही आपल्या चिरपरिचित लयीत आला अन त्याने मुंबईसाठी 5000 आणि 20-20 मधल्या 11000 धावा पुर्ण करत आणखी एक मैलाचा दगड गाठला.अशी कामगिरी करणारा तो दुसराच आहे. प्रथम क्रमांकावर अर्थातच विराट आहे.या(IPL 2023) आक्रमक फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने 9 व्या षटकातच 100 धावा पूर्ण केल्या तर यानंतर अगदी थोड्याच वेळात या जोडीने दुसऱ्या गडयासाठी 100 धावांची मौल्यवान भागीदारी करत आपले आव्हानही जिवंत ठेवले.

पुढच्याच चेंडुवर एक उत्तुंग फटका मारत त्याने आपले 42 वे अर्धशतक पूर्ण केले.या धावा त्याने 30 चेंडूत पुर्ण केल्या.तो आज नशीबवानही ठरला, त्याला अर्धशतकानंतर आणखी एक सोपे जीवदान मिळाले. काहीही होवो रोहितचे फॉर्मात येणे भारतीय संघासाठी फार महत्वपूर्ण आहे,आयपीएलचे काहीही होवो, पण त्यानंतर लगेचच भारतीय संघ विश्व कप कसोटी स्पर्धेच्या अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघांविरुद्ध लढणार आहे.

Hinjawadi : आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक

एकदिवशीय,20-20 विश्वकप जिंकलेल्या भारतीय संघाला कसोटी स्पर्धेचा कप यावर्षी खुणावत आहे,कारण गील,विराट,रहाणे, पुजारा आणि आता रोहित भरात येत आहे,यासम मोठी आनंदी बातमी कुठलीही नसेल.रोहितपेक्षाही आज जास्त आकर्षक आणि आक्रमकही खेळत होता तो उंचापुरा ग्रीन.त्याच्या दर्जाबद्दल कुठल्याही रसिक प्रेक्षकांना शंका नसेल,कारण नुकत्याच झालेल्या भारतीय दौऱ्यात त्याने भारतीय गोलंदाजीचा भारतातच कडक सामोपचार घेतला होता.

आजही मुंबई इंडियन्स साठी महत्वाच्या या सामन्यात त्याने तसाच धडाकेबाज खेळ करत संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.ही जोडी चांगलीच जमली असे वाटत असतानाच रोहीतच अप्रतिम झेल घेत रेड्डीने त्याची खेळी समाप्त करत संघाला दिलासा दिला.रोहीत 37 चेंडूत 56 धावा करुन डागरच्या गोलंदाजीवर बाद झाला.पण त्याने संघाच्या विजयाचा पाया रचला होता.त्याने ग्रीनसोबत दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची मोठी भागीदारी केली.

त्यानंतर आला तो सूर्यकुमार यादव, यावेळी मुंबई इंडियन्सला 40 चेंडू 49 धावा हव्या होत्या ,सूर्याने पहिल्याच चेंडू वर खणखणीत चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले.त्याने हाच धडाका पुढे चालू ठेवत संघाचा विजय अगदी जवळ आणून ठेवला. तो इतका जवळ होता की विजयासाठी 9 अन ग्रीनला शतकासाठी 6 धावा हव्या होत्या.

त्याचे शतक होणार का ही एकमेव उत्सुकता बाकी होती, काही गमतीदार गोष्टीनंतर अखेर त्याने आपले पहिले आणि या सीझनमधले सर्वात जलद शतक पूर्ण करत संघाला 8 गडी आणि दोन षटके राखून दणदणीत विजय मिळवून दिला.ग्रीनने केवळ 47 चेंडूत 8 चौकार आणि तितकेच षटकार मारत आपले पहिले शतक पूर्ण केले,सुर्यकुमार 16 चेंडूत 25 धावा काढून नाबाद(IPL 2023) राहिला.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद
5 बाद 200
विवरांत 69,मयंक 83,क्लासेन 18,मार्करम नाबाद 13
मढवाल 37/4,जॉर्डन 42/1
पराभूत विरुद्ध

मुंबई इंडियन्स
18 षटकात 2 बाद 201
रोहीत 56,ईशान 14,ग्रीन नाबाद 100,सूर्यकुमार नाबाद 25

भुवनेश्वर 26/1, डागर 40/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.