IPL 2023 : शेरास सव्वाशेर ठरलेल्या गीलच्या अविस्मरणीय खेळीमुळे बेंगलोर स्पर्धेबाहेर

बंगलोरच्या वाटयाला आली निराशा,तर मुंबईची लागली लॉटरी.

एमपीएससी न्यूज(विवेक कुलकर्णी) : करो वा मरो या कठीण परिस्थितीत संघासाठी आपले सर्वोत्तम योगदान देत आजच्या क्रिकेटयुगातली रणमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीच्या विक्रमी सातव्या शतकाच्या जोरावर ( IPL 2023) बंगलोर संघाने गुजरात टायटन्सला 198 धावांचे मोठे लक्ष दिले पण शुभमन गीलच्या तितक्याच सुंदर खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने हे आव्हान लीलया पेलत आरसीबीवर दणदणीत मात मिळवून आपले पहिले स्थान कायम तर राखलेच पण त्याचबरोबर आरसीबीला स्पर्धेबाहेर काढत मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफ मधला प्रवेशही पक्का केला.

Yerawada : उपविभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू

आयपीएल 2023 च्या 16 व्या सीझनमधल्या साखळी फेरीतल्या शेवटच्या आणि एकूण 70 व्या सामन्याला बंगलोरच्या चिंनास्वामी मैदानावर सुरुवात झाली,ज्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगलोरमध्ये आज पाऊस येईल असे हवामानखात्याने भाकीत व्यक्त केले होते ते खरेच ठरले, फक्त तो पाउस आभाळातून नाही तर किंग कोहलीच्या बॅटमधून धावांचा आला.विराट आणि गीलने आज एकापेक्षा एक जबरदस्त खेळी करत शतक केले,सॉरी विक्रमी शतक केले.

कोहलीने सलग दोन सामन्यात दोन शतके मारणारा आयपीएल मधला तिसरा ,सात शतके करणारा एकमेवफलंदाज, “गेल द युनिव्हर्सल बॉसला” मागे टाकले.60 चेंडूत शतक पूर्ण केले ज्यात होते 13 चौकार आणि 1 षटकार ,मोठया सामन्याचा खेळाडू का म्हणतात ते सिद्ध केले. मागील काही नाही तब्बल तीन वर्षं म्यान झालेली बॅट त्या थांबलेल्या धावांची भरपाई करत आहे, व्याजासकट.”किंग कोहली” इज बॅक इन फॉर्म.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची दणकेबाजच झाली.जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या डूप्लेसी आणि कोहली या जोडीने 7 षटकात 67 धावांची खणखणीत सलामी देत सुरुवात तरी झकास केली होती, पण डूप्लेसी 28 धावा करुन नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला अन थोड्याच वेळात ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरार बाद झाले अन एक बाद 67 वरुन आरसीबीची अवस्था तीन बाद 85 अशी झाली, त्यानंतर मायकेल ब्रेसवेलने कोहलीला थोडी फार साथ देत डाव सावरला पण तोही 26 धावा करुन शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला ,पाठोपाठ दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो तसाच चालू राहिला,तो जसा आला तसाच गेला, यावेळेस गुजरात टायटन्स सामन्यात वरचढ आहे असे वाटत असतानाच सुरू झाला द विराट कोहली शो.

प्रत्येक खेळाडूंच्या आयुष्यात येतो(साक्षात डॉन ब्रॅडमन सुद्धा या अपवाद ठरले नाहीत,तरीही त्यांची सरासरी 99 आहे)तसाच एक बॅडपॅच यांच्याही आयुष्यात आला,त्याने त्याचे आयुष्य सैरभैर केले, आधी 20-20 मधले,मग हळूहळू एकदिवसीय सामन्यातले,मग कसोटीतलेही नेतृत्व गेले,नव्हे हिसकावून घेतले गेले,कितीही नाही म्हटले तरी यामुळे त्याचे खूप काही गेले होते, गेला नव्हता तो त्याचा माज.पराक्रमी योद्ध्याला त्याच्या पराक्रमाइतकाच माज शोभतो का हा वादाचा विषय सोडून द्या,पण जग विरोधात गेले तरीही त्याने आपला माज सोडला नाही.

भल्याभल्याला नडलेल्या गांगुलीला सुद्धा नडला विराट त्या याच खमक्या वृत्तीपायी, कारण त्याला एकच माहीत होते फॉर्म जाणे क्षणिक असते,क्लास कायमस्वरूपी टिकतो.यावर विश्वास ठेवून तो लढत राहिला, मन दुखावले असेल,रक्तबंबाळही झाले असेल पण तो ( IPL 2023) खचला नाही, अन मागील वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात त्याने जे दोन देखणे षटकार मारले होते, त्याने त्याला तो आत्मविश्वास दिला, मग 20-20त शतक झाले ,त्यानंतर सुरु झाला त्याच्या बॅट मधून धावांचा आणि विक्रमाचा ओघ.

प्रत्येक मोठ्या खेळीसोबत एकेक विक्रम पादाक्रांत करणाऱ्या किंग कोहलीने आजच्या मस्ट विन सामन्यात एक बाजू बाजीप्रभूच्या पराक्रमाची याद यावी अशी लढली आणि संघाला एक मजबूत धावसंख्या उभारून देण्यात मोठा वाटा उचलला.विराटच्या या अविस्मरणीय खेळीमुळे बंगलोर संघाने 197 धावांचे मोठे अन रॉयल  लक्ष गुजरात टायटन्स पुढे ठेवण्यात यश मिळवले.ही खेळी वांझोटी न ठरू देण्याची जबाबदारी आता आरसीबीच्या गोलंदाजांची होती.

या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात म्हणावी तितकी चांगली झाली नाही, वृद्धीमान साहा आणि शुभमनने डावाची सुरूवात केली खरी पण साहा डावाच्या तिसऱ्याच षटकात फक्त 12 धावा काढून बाद झाला.त्याच्याजागी खेळायला आला तो विजय शंकर.
विजय शंकरने गीलला उत्तम साथ देत गुजरात टायटन्सचा डाव सावरला. त्याने 35 चेंडूत 50(कारकिर्दीतले 3रे अर्धशतक)धावा करुन आरसीबी संघाच्या प्ले ऑफच्या आशा धूसर करायला सुरुवात केली.

दुसऱ्या बाजूने गील एक अविस्मरणीय खेळी करत होता. गील जितके आकर्षक खेळतो तितक्याच आक्रमकतेने तो उत्तुंग षटकारही मारतो. बघताबघता ही जोडी चांगलीच जमली.123 धावांची दमदार भागीदारीही या जोडीने केली. याचवेळी विजय शंकर एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात 53 धावांवर असताना आपली विकेट गमावून बसला. यानंतर दशुन शनाका,डेविड मिलरही आले अन गेले,यावेळी वाटत होते की क्रिकेटची अनिश्चितता इथे ही आरसीबीची साथ देईल,पण तसे होणार नव्हते.

कारण दुसऱ्या बाजूने शुबमन गील मैदानावर पाय रोवून उभा होता. त्याने अतिशय आकर्षक फलंदाजी करत आपले वैयक्तिक दुसरे शतक पूर्ण केले जे सलग दुसऱ्या सामन्यात आले.आजच्याच सामन्यात हा पराक्रम दुसऱ्यादा झाला.अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला.सलग ( IPL 2023) दोन आयपीएल सामन्यात शतक करणारे फलंदाज,धवन, बटलर ,कोहली अन गील आहेत.शेवटच्या षटकात गीलने उत्तुंग षटकार ठोकत हा विक्रम पूर्ण केला अन याचबरोबर संघाला 6 गडी राखून दणदणीत विजयही मिळवून दिला.


या विजयामुळे गुजरात टायटन्स सर्वाधिक विजय मिळवून प्रथम क्रमांकावर थाटात विराजमान झाले तर आरसीबी बाहेर पडल्याने आता मुंबई इंडियन्स प्ले ऑफ साठी पात्र झाले आहे.
गुजरात आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी येत्या 23 तारखेला चेन्नई विरुद्ध लढणार आहे

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
5 बाद 197
डूप्लेसी 28,ब्रेसवेल 26 अनुज रावत नाबाद    23, कोहली नाबाद 101
नूर अहमद 39/2,शमी 39/1,रशीद खान 24/1
पराभूत विरुद्ध
गुजरात टायटन्स
19.1 षटकात 4 बाद 198
शंकर 53, साहा 12,गील नाबाद 104
सिराज 32/2,हर्षल पटेल 26/1.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.