IPL 2023-लखनऊ सुपर जायंट्सला चिरडत मुंबईने गाठली कॉलीफायर 2 ची फेरी.

युवा आकाश मढवालची ऐतिहासिक विक्रमी कामगिरी.

एमपीएससी न्यूज:(विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ज्या मुंबई गोलंदाजीवर या मोसमात सदैव टीका झाली, त्याच गोलंदाजांनी बलाढ्य लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी दणदणीत मात देत त्यांचा या मोसमातला प्रवास खतम करत कॉलीफायर 2 मध्ये शानदार प्रवेश करून दिला आहे.

युवा आकाश मढवालने प्ले ऑफ मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करताना केवळ 5 धावा देत 5 बळी मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

आजच्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ,या महत्वाच्या सामन्यातही रोहीत संघाला विशेष काही योगदान देवू शकला नाही, गेल्या काही काळापासून त्याचा फॉर्म येतो अनजातो असाच असतो, आजही त्यात फारसा बदल झाला नाही.

मागच्या सामन्यातले अर्धशतक तसेही नशिबाच्या कृपेनेही झालेले होते, यावेळी ना तशी नशीबाची कृपा झाली, ना त्याने मोठी खेळी केली. त्यानंतर थोड्याच वेळात ईशान किशनही कर्णधाराचा आदर्श घेत पूरनच्या हातात झेल देवून यश ठाकूरच्या गोलंदाजीवर 15 धावा काढून बाद झाला अन मुंबईची अवस्था 4.2 शतक 2 बाद 38 अशी बिकट झाली.यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीन ही जोडी जमली आणि त्यांनी वेगवान धावा करत डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची चांगली भागीदारीही केली, मात्र ही जोडी जमली असे वाटत असतानाच नवीन उल हकने 11 व्या षटकात ही जोडी तंबूत परत पाठवून मुंबईच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.

दोघेही जमले होते, आणि आपल्या नैसर्गिक लयीत आले आहेत असे वाटत असतानाच नवीनने जबरदस्त गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला दोन मोठे  धक्के दिले. या धक्क्याने टीम डेविड आणि तिलक वर्मा या जोडीला धावा काढताना चांगलीच अडचण आली, याच दडपणाखाली डेविड बाद झाला पण त्यानंतर तिलक वर्मा,आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या नेहल वढेराने काहीशी जोखीम उचलत साहसी फटके मारत संघाला 182 धावांची बऱ्यापैकी चांगली धावसंख्या गाठून दिली. लखनऊ संघाकडून नवीन उलहकने 4 तर यश ठाकूरने तीन बळी मिळवून मुंबई इंडियन्सला 200च्या आत रोखण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली.

Pimpri : सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द

या मैदानावर ही धावसंख्या नक्कीच छोटे नव्हती, हा एकवेळ मुंबई इंडियन्स 200च्या पुढे जाईल असे वाटत असतानाच मुंबई 182 धावाच करू शकले होते , पण तरीही लखनऊ संघासाठी ही धावसंख्या फार मोठीही नव्हती,पण कालच्या पहिल्या कॉलीफायरच्या सामन्यात जसे नेतृत्व धोनीने कुशलतेने केले होते, आज अगदी तस्सेच नेतृत्व रोहितने करुन दाखवत युवा गोलंदाजांकडून शानदार कामगिरी करुन घेत संघाला मोठा विजय तर मिळवून दिलाच, पण मुंबई इंडियन्सला एकदा सूर सापडला की ते किती खतरनाक इतरांसाठी असतात तेच आज पुन्हा सिद्ध करुन दाखवताना पांड्या आणि कदाचित धोनीची झोप उडवली असेल.

Vadgaon Maval : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिंदे तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनविरोध निवड

या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. युवा पण प्रतिभावंत प्रेरक मंकड आज फक्त 3 धावा करुन आकाश मढवालच्या गोलंदाजीवर बाद होवून तंबूत परतला, यानंतर दुसरा सलामीवीर कायले मेयर्सही फक्त 18 धावा काढून जॉर्डनची पहिली शिकार ठरला. यानंतर कर्णधार कृनाल पांड्या आणि अष्टपैलू मार्कस स्टोयनीस या जोडीने चांगल्या पद्धतीने प्रतिकार करत डाव सावरला होता, ही जोडी जमली आहे असे वाटत असतानाच कर्णधार पांड्या एक खराब फटका मारून चावलाला आपली विकेट बहाल करुन तंबूत परतला.

पुढच्या षटकात सलग दोन चेंडूवर आकाशने आयुष बदोनी आणि निकोलस पूरनला बाद करुन लखनऊ संघाला पुरते अडचणीत आणले.5 बाद 74 अशी धावसंख्या असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा संघ यानंतर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि त्यांचा संघ 5 बाद 74 वरुन सर्वबाद 101 झाला.

मार्कस स्टोयनीसने एकहाती लढत झुंजार प्रयत्न केले खरे पण ते फाटक्या आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयास करण्यासारखे होते, तो दुर्दैवाने धावबाद होताच लखनऊ सुपर जायंट्स मोठ्या फरकाने हारणार हे स्पष्ट जाणवत होतेच,युवा आकाश मढवालने या परिस्थितीचा अचुक फायदा उचलत आपली वैयक्तिक विक्रमी कामगिरी नोंदवून प्ले ऑफ मधे सर्वाधिक बळी घेणारा (तेही केवळ 5 धावात)पहिला गोलंदाज म्हणून आपले नाव आयपीएलच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून घेतले आहे.

आकाश मढवाललाच सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स
8 बाद 182
किशन 15,ग्रीन 41,सुर्या 33,तिलक 26,नेहल 23,टीम डेविड 13
नवीन उल हक 38/4,यश ठाकूर 34/3,मोहसीन 24/1
विजयी विरुद्ध
लखनऊ सुपर जायंट्स
16.3 षटकात  सर्वबाद 101
मेयर्स 18,स्टोयनीस 40,हुडा 15
मढवाल 5/5,जॉर्डन 7/1,चावला 28/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.