IPL 2021 : बातमी आयपीएलची ! गब्बर धवनची घणाघाती फलंदाजी,संघाला मिळवून दिला एकहाती विजय

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी ) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर आजच्या डबल धमाका असलेल्या रविवारच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ने पंजाब किंग्सला 6 विकेट आणि 11 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.

शिखर धवनची तुफानी फलंदाजी दिल्लीला विजयपथावर घेऊन गेली आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर खेळणाऱ्या के एस राहुलला टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला यावे लागले, दिल्लीच्या पंतने नाणेफेक जिंकून राहुलला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

राहुलने मयंक आगरवालच्या सोबतीने अतिशय आक्रमक सुरुवात करून दिली,यावेळी मयंक जास्त आक्रमक दिसत होता, त्याचा जोश ओळखून राहुलने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली, त्याचा योग्य फायदा घेता जलदगतीने अर्धशतक नोंदवले.

अर्धशतकी खेळी केल्यानंतर मयंक जास्तच आक्रमक होत गेला आणि याच फटकेबाजीच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला,पण त्याने 4 षटकार आणिसात चौकाराच्या साहाय्याने केवळ 36चेंडूत 69धावा करत राहुलच्या साथीने चांगली सलामी भागीदारी केली होती.

खरेतर यानंतर जम बसलेल्या लोकेश राहुलने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत आणखी मजबूत धावसंख्येकडे संघाला न्यायला हवे होते,पण..अर्थात जर तर आणि पण या शब्दाला क्रिकेटमध्ये जराही अर्थ नसतो, आपले वैयक्तिक अर्धशतक करून राहुल संघाला अनपेक्षितरित्या मध्येच सोडून गेला आणि मोठी धावसंख्येकडे कूच करत असलेल्या पंजाब किंग्जच्या आशेला सुरुंग लागला,

_MPC_DIR_MPU_II

यानंतर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलं आणि भावी गेलं म्हणून ओळखला जाणारा निकोलस पुरन ही स्वतात बाद झाल्यानंतर पंजाब संघ निर्धारित 20 षटकात 195 धावाच करू शकला,अर्थात वानखेडेवर पाठलाग करताना या धावा फार वाटतात.

पण या समजाला गैरसमज करताना मूळचा मुंबईकर आणि वंडरबॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉ ने जोरदार हल्ला चढवत संघाला शानदार सलामी मिळवुन दिली,शॉ फारच आक्रमक झाला होता केवळ 17 चेंडूत 32 धावा करताना त्याने जे दोन समोर लॉंगऑनला देखणे षटकार मारले ते त्याचा दर्जा दाखवून देणारे आणि सिद्ध करणारेही होते पण केवळ आक्रमण म्हणजेच सर्व काही नसते याची जाणीव नसल्यासारखे त्याने आक्रमक होताना आपली विकेट गमावली

आणि यानंतर सर्व सूत्र आपल्या हातात घेत शिखर धवन उर्फ गब्बरने आपल्या नावाला आणि किर्तीला साजेसे फलंदाजी करत संघाला विजयासमीप आणून ठेवले, यावेळी तो आपले शतक तर पूर्ण करेलच पण दिल्लीला एक मोठा विजयही सहज मिळवून देईल असे वाटत असताना तो 92 धावावर त्रिफळाबाद झाला पण या धावा त्याने केवळ 49 चेंडूत करताना संघाची अपेक्षित धावगती सतत दहाच्या सरासरीपेक्षाही जास्त ठेवली होती.

स्मिथ आणि कर्णधार पंत हे लागोपाठ बाद झाल्याने हा सामना सुद्धा रंगतदार होईल का असे वाटत असताना मार्क स्टोयनिसने शेवटचा प्रहार करताना

जवळपास दोन षटके आणि सहा गडी राखून मोठा विजय मिळवून दिला आणि नवोदित कर्णधार रिषभ पंतचा आनंद ओसंडून वाहू लागला,आणि का  वाहू नये?त्याने चेन्नई नंतर पंजाब किंग्स सुद्धा दणदणीतरित्या हरवले आहे.

आपल्या जबाबदारीवर संघाला जबरदस्त आणि मोठा विजय मिळवून देणारा शिखर उर्फ गब्बर सामनावीर सह अनेक मोठया आणि घसघशीत बक्षीसाचा मानकरी ठरला,जे सर्वार्थाने योग्यच होते. बर्थडे बॉय राहुल मात्र विजयाजवळ येऊनही विजय न मिळाल्याने नक्कीच नाराज झाला असणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.