Pune News : आयपीएलवर सट्टा, पुण्यातील दोन बुकी जाळ्यात, कारवाईत दुबई कनेक्शन उघड

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी शहरात सुरू असणाऱ्या क्रिकेटवरील सट्टाबाजाराचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी क्रिकेटवरील आंतरराष्ट्रीय सट्टा ओपन करत दोन बड्या बुकींना ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान या बुकींचे दुबई कनेक्शन असल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दोघांकडून तब्बल 92 लाख रुपयांची रोख रक्कम आणि ऐवज जप्त केला आहे. 

सट्टाकिंग गणेश भुतडा व अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. ही माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. दोन्ही ठिकाणावर 92 लाख रुपये रोख आणि 65 हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांचे दुबई कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेकांची धागे हाती लागले आहेत. त्यामुळे छोट्या बुकिंचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.