Mumbai: प्रेक्षकाविना आयपीएलचे सामने खेळवण्यास काही हरकत नाही – अजिंक्य रहाणे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू सर्व जगभर थैमान घालत असताना किडा रसिकांची मात्र मोठी निराशा होत आहे. दरवर्षी दोन महिने चालणारा आयपीएलचा सीजन यावेळी मात्र कोरोनाच्या संकटामुळे होण्याची शक्यता दिसून येत नाही, मात्र भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य राहणे यांने प्रेक्षकाविना आयपीएलचे सामने खेळवण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

लाॅकडाऊन मुळे बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगाम सुद्धा बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र काही आजी-माजी खेळाडू प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयार असल्याचे दिसून येते आहे या गोष्टीला आता मराठमोळ्या अजिंक्य रहाणे यांने सुद्धा दुजोरा दिला आहे.

अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलताना म्हणाला,

‘आम्ही सर्वांनी स्थानिक क्रिकेट प्रेक्षकांविना खेळलं आहे. त्यामुळं आम्हाला याची सवय आहे. कोरोनामुळं सध्याची परिस्थिती लक्षात घेता चाहत्यांसाठीही ही गोष्ट योग्य आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांना येणारी गर्दी स्थानिक सामन्यांसाठी येत नाही. चाहत्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. रिकाम्या मैदानावर सामने खेळवले जाणार असतील तर ते सर्वांसाठी योग्य ठरेल व आमचा याला पाठींबा आहे.

अजिंक्य रहाणे आयपीएलच्या बाराव्या हंगामापर्यंत ‘राजस्थान रॉयल्स’ या संघाचे प्रतिनिधीत्व करत होता. तेराव्या हंगामासाठी  ‘प्लेअर ट्रान्सफर विंडो’ अंतर्गत अजिंक्यला दिल्लीच्या संघात प्रवेश दिला गेला आहे. दरम्यान खेळाडू रिकाम्या मैदानावर सामने खेळण्यासाठी तयार असले तरीही बीसीसीआय अद्याप निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत नाही आहे.

आयपीएलचे सामन्यादरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होत असते, तसेच मोठ्या प्रमाणावर तिकीट विक्री आणि मनोरंजनाचे माध्यम उपलब्ध होत असल्याने सर्व क्रिकेट प्रेमी आयपीएलच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात यावेळी मात्र सर्व जग कोरोनाशी लढत असताना आयपीएलचे सामने होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.