IPL News : अखेर हैदराबादचा” सन” एकदाचा झाला “राईज”, रोमहर्षक सामन्यात आरसीबीवर केली चार धावांनी मात

एमपीसी न्यूज – अबू धाबीच्या अलिशान मैदानावर झालेल्या या सामन्यात विजयाचे दोलायमान पारडे अखेरीस भुवनेश्वरच्या अनुभवी आणि प्रभावी स्विंग गोलंदाजीने हैदराबादच्या बाजूने पडले आणि शेवटी का होईना सनरायजर्स हैदराबाद संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.

एका संघाचे आव्हान कधीच संपलेले तर दुसरा संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरलेला असल्याने या सामन्याच्या निकालाने विशेष फरक दोन्ही संघाना पडणार नसला तरी आणखी एका विजयासह आत्मविश्वास आणखी बुलंद करून पुढे जाण्यासाठी विराट आणि त्याची टीम उत्सुक होती, तर किमान आपले अस्तित्व जाणवून देण्याचा एक प्रयत्न म्हणून केन विलीएम्सन या सामन्याकडे बघत होता.

कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक विक्रम नोंदवलेले आहेत, पण तो नाणेफेक बऱ्याचदा हारतो असा एक अपसमज त्याच्या बद्दल प्रचलित आहे, हा खरंतर खोटाच किंवा चुकीचा समज आहे, पण आज तरी त्याने नाणेफेक जिंकली आणि लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सनरायजर्सकडून युवा अभिषेक शर्मा आणि जेसन रॉयने सुरुवात केली. आयपीएल बद्दल अनेक लोकांची अनेक मतं आहेत, पण आयपीएल मुळे किमान आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ अनेक युवा खेळाडूंना मिळाले, त्यातून जे तावून सुलाखून बाहेर पडले त्यांचे आयुष्य शंभरनंबरी सोने झाले, जडेजा, बुमराह पासून ते ईशान किशन, सुर्यकुमार यादव पर्यत अनेक खेळाडू यातूनच भारतीय संघात आलेले आहेत.

अभिषेक शर्मा हा डावरा फलंदाज सुद्धा खूप प्रतिभावंत आहे असे म्हटले जाते. योग्य संधी मिळताच तिचे सोने करणे जमायला हवे, आज अभिषेकने जोरदार सुरुवात केलीच होती की तो दहा चेंडूत तेरा धावा काढून मॅक्सवेलच्या हातात झेल देऊन जॉर्ज गोर्टनची शिकार झाला. त्याच्या जागी कर्णधार केन विलीएम्स खेळायला आला. दोघांनी मिळून 70 धावांची भागीदारी केल्यानंतर केन वैयक्तिक 31 धावा काढून बाद झाला. सुरुवात त्याने चांगली केली होती, पण नंतर त्याला ती लय कायम ठेवता आली नाही, त्याच्याजागी आलेल्या प्रियम गर्गला सुध्दा आज विशेष काही करून दाखवता आले नाही.

पाठोपाठ जम बसलेला जेसन रॉय सुद्धा वैयक्तिक 44 धावांवर ख्रिस्तीयनच्या गोलंदाजीवर बाद झाला,आणि चांगल्या परिस्थितीत असणारा सनरायजर्सचा सूर्य तळपण्याआधीच मावळायला लागला. होल्डरने शेवटीशेवटी दांडपट्टा चालवला त्यामुळे सनरायजर्स हैदराबादचा संघ आपल्या निर्धारित 20 षटकात सात गडी गमावून 141 धावाच जमवू शकला, खरेतर 1 बाद 84 अशा चांगल्या परिस्थितीत असतांना त्याना 141 धावाच जमवता आल्या, याचे बरेचसे श्रेय हर्षल पटेलच्या गोलंदाजीलाही जाईल. त्याने आजही आपला फॉर्म कायम ठेवत तीन गडी बाद करताना 33 धावा दिल्या. तर ख्रिस्तीयन दोन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. हैदराबाद कडून जेसन रॉयने सर्वाधिक 44 धावा केल्या. आरसीबी संघांसाठी तसे हे आव्हान क्षुल्लकच होते, पण क्रिकेटमधे जे वाटते ते होतेच असे नाही, याचा प्रत्यय पुढील 20 षटकानंतर क्रिकेटरसिकांना पुन्हा एकदा आलाच.

142 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहली भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात केवळ 5 धावा करून बाद झाला.पाठोपाठ ख्रिस्तीयनला सिद्धार्थ कौलने एकाच धावेवर बाद करून आरसीबीची अवस्था दोन गडी बाद 18 अशी केली. आणखी वीस धावांची भर पडते न पडते तोच श्रीकर भरतला उम्रान मलीक या कश्मिरी युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच षटकात 12 धावांवर तंबूत पाठवून आरसीबीच्या संघाला आणखी एक मोठा धक्का देऊन खळबळ माजवली. यावेळेस आरसीबीची अवस्था तीन गडी बाद 38 अशी झाली होती.पण या कठीण परिस्थितीतुन संघाला सावरले ते या मोसमात जबरदस्त लयात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने, याआधीही त्याने लागोपाठ तीन अर्धशतके नोंदवून आपल्या नावाचा डंका आयपीएल मध्ये आधीच गाजवलेला आहे, आजही त्याने त्याच फॉर्मचा फायदा उठवला. आजही जबरदस्त फलंदाजीचे त्याने प्रदर्शन केले, आपले 5 वे लागोपाठचे अर्धशतक तो सहज नोंदवेल असे वाटत असताना कर्णधार केन विल्लीयम्सनने एका अचूक थ्रो वर त्याला 40 धावांवर धावबाद करून त्याची खेळी संपवली.

ग्लेन मॅक्सवेलने 25 चेंडूत धावा करताना तीन चौकार आणि दोन षटकार मारले. तो बाद झाला आणि इथूनच सामना सनरायजर्स कडे झुकू लागला, ग्लेन बाद झाला तेव्हा आरसीबीची अवस्था 14 षटकात 92 होती, आणि अजूनही विजयासाठी त्यांना 25 चेंडुत 40 धावा हव्या होत्या.आतापर्यंत चांगला खेळत असलेल्या देवदत्त पडीकलचा संयम रशीद खानने अंत पाहिल्याने संपला आणि 52 चेंडुत 41 धावा करून तो रशीद खानला भिरकावून देण्याच्या नादात सीमारेषेवर समदच्या हाती झेल देऊन बाद झाला.यानंतर आलेल्या शाहबाज अहमदने दांडपट्टा चालवत हल्ला चढवल्यामुळे आणि त्याच नादात तो होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने सामना आरसीबीकडे म्हणजेच कधी इकडे कधी तिकडे असा झुकत होता,पण होल्डरने 19 वे षटक जबरदस्तरित्या टाकत एक विकेट ही मिळवली आणि शेवटच्या षटकात सहा चेंडूत 13 धावा काढण्याचे लक्ष ठेवले. अन मग अनुभवी भुवनेश्वरने होल्डरने खांदलेल्या पायावर कळस चढवत अप्रतिम गोलंदाजी करत 9च धावा देत जगातल्या सर्वांत स्फोटक फलंदाज एबीडीला रोखून धरण्यात यश मिळवून संघाला 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

खरे तर या विजयाने सनरायजर्सला काही फायदा होणार नाही, ना विराटच्या आरसीबीला फारसं नुकसान, पण या पराभवाने विराटच्या संघाला एक धक्का नक्कीच बसला आहे,आता त्याने आरसीबी खडबडून जागे होणार की याचा धसका घेऊन खचून जाणार,ते ये काहीच दिवसात सर्वाना दिसणार आहेच,नाही का?

गोलंदाजीत अप्रतिम बदल करणाऱ्या, मॅक्सवेलला धावबाद करणाऱ्या आणि फलंदाजीत महत्वपूर्ण 31 धावा करणारा कर्णधार केन सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.