IPL News : उत्कंठावर्धक सामन्यात केकेआरने दिल्ली संघावर केली तीन गडी राखून मात

अंतिम चार संघात राहण्याची आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज – आधी दिल्ली सारख्या बलाढ्य संघाला 127 धावांवर रोखल्यानंतर शुभमन गीलच्या आकर्षक फलंदाजीमुळे आणि नंतर सुनील नारायणच्या आक्रमक फलंदाजीमुळे तर कठीण परिस्थितीत डोके शांत ठेवून अवघड विजय सोपा करणाऱ्या नितीश राणामुळे केकेआर संघाने मजबूत अशा दिल्ली कॅपिटल्स संघांवर तीन गडी राखून केलेली मात आणि यामुळेच अंतिम चार संघात असण्याची जिवंत राहिलेली आशा आजच्या सामन्याचे खास वैशिष्ट्ये ठरले.

आयपीएल 2021 चा हा आजचा 41 वा सामना शारजा येथील मैदानावर होता, केकेआरच्या कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीने आज पृथ्वी शॉ ऐवजी स्टीव स्मिथला संघात सामील करून घेतले, धवन आणि स्मिथने बर्यापैकी फलंदाजी करताना 35 धावांची सलामी दिली. पण शिखर धवन वैयक्तिक 24 धावा करून फर्ग्युसनचा बळी ठरला, त्याने 20 चेंडूत आक्रमक 24 धावा केल्या, ज्यात 5 चौकार सामील होते. तो बाद झाल्यावर मागील दोन सामन्यात चांगला सूर गवसेलेला श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला खरा, पण हाय रे दुर्दैवा, सुनील नारायणने त्याला केवळ एक धावा असताना त्रिफळाबाद करून दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला.

शारजा मैदानावर चेंडू हळुवार येत असल्याने धावा जमविणे सोपे नव्हते,त्यात या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा धवन आणि पाठोपाठ अय्यर बाद झाल्याने दिल्लीवरचा दबाव आणखीनच वाढला.पण धुवांधार फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध असणारा पंत आल्यावर स्मिथ आणि त्याने संघाला 77 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर स्मिथ सुद्धा कर्णधाराची साथ सोडून तंबुत परतला. स्मिथने फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी 34 चेंडूत 39 धावा काढल्या, यानंतर मात्र दिल्ली संघाला हव्या त्या गतीने धावा काढणे जमलेच नाही, खेळपट्टी गोलंदाजीला धार्जिणी झाली होती, म्हणूनच पंतसारखा आक्रमक फलंदाज असुन सुद्धा दिल्ली संघांचा डाव 20 षटकात केवळ 127 धावाच काढू शकला. तीन बाद 77 अशी समाधानकारक परिस्थिती असताना सुद्धा संघ 4 बाद 88, बाद 89, सहा बाद 112 ते 20 व्या षटकाअखेर 9 गडी बाद 127 अशी केविलवाणी धावसंख्या धावफलकावर लावू शकला, पंतने धोका स्वीकारून काही साहसी फटके मारल्याने तरी 127 धावा जमा झाल्या. कोलकाता कडून सर्वच गोलंदाजानी या खेळपट्टीचा फायदा उठवत उत्तम गोलंदाजी केली. लोकी फर्ग्युसन, सुनील नारायण आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले, तर टीम सौदीने एक बळी घेतला, दोन फलंदाज धावबाद झाले, दिल्लीकडून स्मिथ व कर्णधार ऋषभ पंतने यांनी 39/39 धावा केल्या.

उत्तरादाखल खेळताना केकेआर संघाने आश्वासक आणि आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गील आणि वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली असे वाटत असतानाच संघाच्या 28 धावा झालेल्या असताना अय्यर ललित यादवच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला, त्याने 14 धावा काढल्या, पाठोपाठ भरात असलेल्या राहुल त्रिपाठीला सुद्धा आवेश खानने वैयक्तिक 9 धावांवर बाद करून कोलकाता संघाला दुसरा धक्का दिला.यावेळी केकेआरची धावसंख्या 5.3 षटकात 2 बाद 43 अशी होती.

यानंतर यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत विशेष चमक दाखवू न शकेलला नितीश राणा आणि शुभमन गीलने फारशी जोखीम न घेता आणखी 24 धावा जोडलेल्या असताना शुभमन गील वैयक्तिक 30 धावा काढून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला तर पाठोपाठ कर्णधार मॉर्गनने सुद्धा धावसंख्येत जराही भर न घालता आपली विकेट आर अश्विनला बहाल केली.दिनेश कार्तिकला कर्णधारपदावरुन काढून केकेआरने मॉर्गनला हा मुकुट दिला खरा,पण अद्यापही मॉर्गन आपल्या नावलौकिकाला जागलाय असे वाटत नाही, आज तर त्याने भोपळा सुद्धा फोडला नाही.पण सुदैवाने केकेआरकडे षटके आणि विकेट्स बऱ्यापैकी शिल्लक असल्याने फारसे दडपून आले नाही, त्यात आतापर्यंत शांत भासलेली नितीश राणाची बॅट योग्य संधी मिळताच धावा बरसू लागली, त्याला फक्त साथ द्यायचे योग्य काम दिनेश कार्तिकने केल्याने ना खेळपट्टीची भीती वाटली ना पराभवाची. संघाच्या 96 धावा झालेल्या असताना कार्तिक आवेश खानच्या चेंडूवर 14 धावा काढून बाद झाला,पण त्याने कोलकाता संघाला फायदाच झाला, कारण त्याच्या जागी आलेल्या सुनील नारायणने आक्रमक फलंदाजी करताना विजय जवळ आणला.

सुनीलने केवळ 10 चेंडुत 21 धावा करताना 2 षटकार आणि एक चौकार मारला. त्याला विजयाची फारच घाई झालेली दिसत होती, पण अतिघाई संकटात नेई म्हणतात ते उगाच नाही, एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो नोर्जेची शिकार झाला, पण त्याआधी त्याने विजय खरोखरच जवळ आणला होता.पण त्याच्या पाठोपाठ साऊदीपण आवेश खानची शिकार झाल्यानंतर अचानक सामना रंगतदार होईल असे वाटायला लागले होते, पण नितीश राणाने आज कुठल्याही परिस्थितीत डोके शांत ठेवण्याचा उचललेला विडा त्याच्या संघाला 3 गडी राखून विजयी करून गेला, ज्यामुळे कोलकाता संघाला अजुनही अंतिम चार संघात राहण्याची आशा दाखवत आहे.

आधी उत्कृष्ठ गोलंदाजी करत दोन बळी मिळवणारा आणि नंतर कठीण परिस्थितीत आक्रमक खेळी करणारा सुनील नारायण सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.