Pune News : वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना गंडवणाऱ्या इराणी नागरिकाला अटक

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा येथील अनेक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका इराणी नागरिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. पोलिस अधिकारी व सीमाशुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून त्याने ही फसवणूक केली आहे.

 

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्ली व हरियाणा येथे तब्बल 22 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका ट्रकचालकास पोलिस असल्याचे सांगून त्याची  हजारो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. जाफर अलिखान इराणी (वय 30, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, परराज्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून एक व्यक्ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इराणी वस्तीमध्ये वेषांतर करुन राहत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी इराणी वस्तीत पोलिसांचे एक पथक गेले होते. पोलिस असल्याची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू करत त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले.

आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. हरियाणा आणि दिल्लीत त्याच्याविरोधात बावीस गुन्हा दाखल आहेत. सीमाशुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून त्याने हरियाणातील हिसार येथे 45 लाख रुपये व एक किलो सोन्याची चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे.

तर लुधियाना येथे पोलिस असल्याची बतावणी करून 36 तोळे सोने त्याने चोरल्याचाही गुन्हा लुधियाना पोलिसांकडे दाखल आहे. काही दिवसांपूर्वी त्याने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका ट्रक चालकास अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने 27 हजार रुपये घेतले. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.