BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : आयआरबी कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित 

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग व पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आयआरबी कंपनीत देखभाल आणि दुरुस्ती विभागात काम करणार्‍या 179 स्थानिक कामगारांनी तिन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप आज कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मध्यस्तीनंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील देखभाल दुरुस्तीचा आयआरबी कंपनीचा ठेका येत्या 10 ऑगस्ट रोजी संपत असल्याने कामगार चिंतीत झाले आहेत. ठेका संपल्यानंतर देखिल पुढे य‍ाच ठिकाणी कामाची शाश्वती मिळावी यामागणी करिता सदर कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलन‍च्या तिसर्‍या दिवशी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या आंदोलकांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. राज्य सरकार कामगारांच्या पाठिशी असून कामगारांची बाजू राज्य सरकारकडे ठामपणे मांडणार असल्याची ग्वाही दिली. येत्या बुधवारी सार्वजनिक बांधकामंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेगडे यांनी कामगार प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. तो पर्यत हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे. बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरु ठेवण्यात येईल असे भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
शिवसेनेने दिला पाठिंबा
 
आयआरबी कामगारांच्या आंदोलनाला आज शिवसेनेच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, मावळ तालुकाप्रमुख राजु खांडभोरे, शरद हुलावळे, गबळू ठोंबरे, बाळासाहेब फाटक यांच्यासह शिवसैनिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुनिल शेळके यांनी जाणले कामगारांचे प्रश्न
 
तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी आयआरबी कामगारांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तसेच रस्ते विकास महामंडळांचे अधिकारी यांची भेट घेत कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3