Pimpri: पवना धरणातून 480 नव्हे 440 एमएलडीच पाणी उचला; पाटबंधारे विभागाची पालिकेला तंबी

40 एमएलडी पाणी होणार कमी; शहरवासियांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊसाने दडी मारली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 एमएलडी मर्यादित पाणी उपसा ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याच्या काटसकरीने वापर करावा, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक 4.84 टीएमसी पाणीवापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधा-याची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधा-यापर्यंत पवना नदीची लांबी 40 किलो मीटर असून पाणी सोडल्यानंतर बंधा-यापर्यंत पोहचण्यास तब्बल 14 तासाचा वेळ लागतो.

_MPC_DIR_MPU_II

सद्यस्थितीत महापालिका मंजुर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधा-यातील पाणीपातळी ‘मेंटन’ ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊसाने दडी मारली. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.

त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर 440 एमएलडी मर्यादीत ठेवण्याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.