Express Way Accident News : भरधाव ईर्टिगा कारची ट्रकला धडक

एकाचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाताना भरधाव ईर्टिगा कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 23) पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत घडली.

किसन बाबुलाल सैनी (रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुनील राजू लाल (वय 22), मथ्थुलाल गुरुलाल लाल (वय 23), शिवलाल कमलूला लाल (वय 24) आणि कार चालक किरण सुरेश राजगुरू (वय 25, रा. सिद्धार्थनगर, सायन कोळीवाडा, एफ एम रोड, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत रुग्णवाहिका चालक अजय मु-हे (वय 28, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक किरण राजगुरू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण राजगुरू हा कार चालक आहे. तो मंगळवारी पहाटे मुंबईहुन पुण्याकडे द्रुतगती मार्गावरून ईर्टिगा कार (एम एच 04 / जी ई 6325) चालवत येत होता. अन्य जखमी आणि मयत सर्वजण त्याच्या कारमध्ये होते. त्याने भरधाव वेगात कार चालवून द्रुतगती मार्गावर समोर जात असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. त्यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर कार चालकासह अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.