Pimpri : शहर राहण्यायोग्य आहे की नाही?, सर्वेक्षण सुरु

एमपीसी न्यूज – नागरिकांना त्यांच्या महापालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे राहणीमान योग्य निर्माण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. शहरातील सुविधांबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये अडीच लाख नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, गतवर्षी राहण्यायोग्य शहरात पिंपरी-चिंचवड 69 व्या क्रमांकावर होते.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली.  या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह देशातील 114 व राज्यातील 12 शहरांचा सहभाग आहे. सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत.  नागरिकांना पुरविण्यात येणा-या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये राहण्या योग्य शहर, महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे.

उद्योग, नोकरी, शहराची अर्थव्यवस्था, दळणवळण, पर्यावरण, सुरक्षितता, गुन्हेगारी याबाबत नागरिकांचे काय मत आहे हे जाणून घेतले जाणार आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत नागरिकांना तीन निर्देशाकांवर प्रश्न विचारण्यात येतील. यामध्ये शिक्षण व आरोग्य सुविधा यांचा दर्जा, उपलब्धता व क्रयशक्ती यांसारख्या प्रश्नांचा समावेश असेल. यामध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तरासाठी पूर्ण सहमत, सहमत, समाधानी, असमाधानी व पूर्ण असमाधानी हे पाच पर्याय उपलब्ध आहेत. राहणीमान सर्वेक्षण हे प्रामुख्याने राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता आणि चिरंतन व स्थायी सुविधा आदी गोष्टींचा सर्वेक्षणात विचार करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, सुरक्षा, विकास, आर्थिक संधी आदींचा देखील समावेश असणार आहे.

सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राहणा-या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण 2019 चा क्यूआर कोड स्कॅन करून या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा. नागरिकांनी राहणीमान सर्वेक्षणामध्ये सहभाग घेऊन सर्व प्रथम https://eol2019.org/citizenfeedback या संकेतस्थळावर जाऊन तसेच सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

सर्वेक्षणासाठी विभागप्रमुखांची कार्यशाळा घेतली आहे. त्याकरिता दोन नोडल अधिका-यांची नियुक्ती केली आहे. मॉल, व्यावसायिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊन माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षणाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रके वाटली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकार देशातील 114 शहरांचा प्रगती अहवाल तीन प्रकारांमध्ये घोषित करणार असून यामध्ये राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज व हवामान इत्यादीचा समावेश असेल. हा अहवाल जून महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे.

”नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा. आपण आज महाराष्ट्रातील सर्वोत्तम सुविधा असलेल्या शहरांपैकी एका शहरामध्ये राहत आहोत. नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेवून आपल्या शहराला अधिक सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्याची जबाबदारी घ्यावी असे” आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.