Thergaon Accident : कंटेनरच्या धडकेत आयटी अभियंत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 13) रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास चिंचवडकडून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थेरगाव येथे झाला.

शैलेंद्रसिंग गणसिंग राजपूत (वय 43, सध्या रा. मारुंजी, ता. मुळशी, पुणे, मूळ रा. एरंडोल, जि. जळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. गणसिंग रामसिंग पाटील (वय 72, रा. एरंडोल, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणसिंग पाटील हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. त्यांचा मुलगा मयत शैलेंद्रसिंग राजपूत हे साॅफ्टवेअर इंजिनिअर होते. शैलेंद्रसिंग राजपूत हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून चिंचवडकडून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी थेरगाव येथे त्यांच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागला. यात राजपूत हे रस्त्यावर पडले. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे राजपूत यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शैलैंद्रसिंग राजपूत हे वर्षभरापूर्वी मलेशियातील नोकरी सोडून पुण्यात आले होते. येथील एका कंपनीत ते काम करत होते. नुकतेच तीन दिवसांपूर्वी एरंडोल येथे आईवडील व मित्र परिवारास भेटून ते पुण्यात परतले होते. शैलेंद्रसिंग यांच्या मागे आईवडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.