Pimpri News : शहरात सकाळपासून पावसाची संततधार, हवेतील गारठा वाढला 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (बुधवार, दि.01) सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून सूर्यनारायणाचे दर्शन होऊ शकले नाही, तर अनेकांना मॉर्निंग वॉकला दांडी मारावी लागली. ऐन हिवाळ्यात पावसाने अवेळी लावलेल्या हजेरीमुळे हवेत गारठा वाढला आहे. 

शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मागील तीन ते साडे तीन तासापासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेकांचा सकाळचा नित्यक्रम चुकला तर, सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली, रस्त्यावरील वाहतूक देखील रेंगाळली पहायला मिळत आहे. ऐन हिवाळ्यात पावसाच्या हजेरीमुळे हवेतील गारठा वाढला असून, पिंपरी चिंचवडकराना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 तासात रायगड,मुंबई, ठाणे आणि पालघर तसेच नाशिक,नगर,पुणे, सातारा येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर सह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच या जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.