Hinjawadi : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियमांचे पालन करणे महत्वाचे – पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज – हिंजवडीमध्ये सध्या शारीरिक सुरक्षा, सायबर सुरक्षा या दोन सुरक्षा महत्वाच्या आहेत. त्यासोबतच वाहतूक सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. अन्य दोन सुरक्षांसाठी जेवढी काळजी घेतली जाते, तेवढीच काळजी वाहतूक समस्यांसाठी सुद्धा घ्यायला हवी. वरील प्रत्येक बाबतीत नियम महत्वाचे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देखील नियम पाळणेच महत्वाचे आहे, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

हिंजवडी मधील हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या सभागृहात आयुक्तांनी हिंजवडी मधील आयटीयन्सशी संवाद साधला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले की, समस्या भरपूर असतात. पण त्या योग्य ठिकाणी मांडायला हव्यात. समूहात समस्या विचारल्यास कोणीही समस्या सांगत नाही. पण वैयक्तिक विचारल्यास प्रत्येकजण समस्या सांगतो. आपल्या अडचणी एकमेकांशी शेअर करा. जबाबदा-या ओळखा आणि नियम पाळा, त्यामुळे प्रशासनातही सुधारणा होतात. हिंजवडी सध्या वाहतुकीच्या समस्येने ग्रासली आहे. तिला त्यातून सोडविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे महत्वाचे आहे.”

अप्पर आयुक्त रानडे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सध्या मनुष्यबळाची सर्वात मोठी अडचण आहे. उपलब्ध मनुष्यबळामध्ये चांगले पोलिसिंग करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस आपल्या पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील त्यासाठी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.”

पोलीस आयुक्त आणि आयटीयन्स यांच्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे

# आयटी कंपन्या आणि प्रशासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी
# एका कारमध्ये किमान दोन प्रवासी असावेत.
# रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे
# वाहतुकीची शिस्त पाळायला हवी
# बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी
# नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा
# हिंजवडीकडे येणा-या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे
# रस्त्यावरील बस थांबे मागे घ्यावेत, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही
# आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करावे
# डी मार्ट, वाईन शॉप समोरील वाहनांना थांबू देऊ नये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.