World Diabetes Day: मधुमेहापासून बचावासाठी तणावमुक्त जीवन जगणे महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र वाबळे

एमपीसी न्यूज – मधुमेह असणा-या व्यक्तींनी आहाराच्या वेळापत्रकाचे पालन, तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार, योग्य औषधांचे सेवन, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सूत्रांचा अवलंब आपल्या जीवन पद्धतीत केल्यास त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगणे सहज शक्य आहे. मधुमेह (World Diabetes Day) या आजारापासून बचाव करण्यासाठी तणावमुक्त जीवन जगणे आणि जीवनशैली मध्ये बदल करणे अतिशय महत्त्वाचे, असे मार्गदर्शन महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे (Yashwantrao Chavan Memorial Hospital) यांनी केले.

जागतिक मधुमेह दिनाचे (World Diabetes Day) औचित्य साधून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेच्या वतीने मेडिसीन विभाग व कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत मधुमेह या आजारावर योग्य उपचार कोणते आहेत तसेच यासाठी योग्य आहार कसा असावा याबाबत मधुमेह तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. मधुमेह या आजाराविषयी जनजागृती देखील यावेळी करण्यात आली.

Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेनिमित्त वारकरी भाविकांकडून राहुट्या मंडप उभारणीला सुरुवात

या कार्यशाळेस मधुमेह तज्ञ डॉ. किशोर खिलारे, डॉ. अभय माने, किडनीतज्ञ डॉ. विवेक बिरादार, मेडिसीन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण सोनी, कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. हर्षल पांडवे, पदव्युत्तर संस्थेचे मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र काळे, डॉ. निरंजन पाठक, सहायक प्राध्यापक डॉ. नितीन वाटोरे, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. दत्ता जुडे, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर यांच्यासह विविध विभागांचे डॉक्टर, पदव्युत्तर संस्थेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त करत अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, मधुमेह या आजारापासून बचाव करण्यासाठी तणावमुक्त जीवन जगणे आणि जीवनशैली मध्ये बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या व औषधे वेळेवर घेतल्यास मधुमेह आटोक्यात येऊ शकतो. या कार्यशाळेमुळे नागरिकांच्या मनात मधुमेहाबद्दल असणाऱ्या शंकांचे काही प्रमाणात निरसन होण्यास नक्कीच मदत झाली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वतीने अशा प्रकारच्या कार्यशाळा यापुढेही घेण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.

वायसीएम रुग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. अभिजित निंबाळकर यांनी मधुमेहाबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती सांगितली. मधुमेहाची लक्षणे, दीर्घकालीन मधुमेहामुळे होणारे विकार, मधुमेहाचे निदान तसेच मधुमेह होऊ नये याबाबत घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. मधुमेह जनजागृती मोहिमेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

आहारतज्ञ डॉ. आज्ञा आणि डॉ. अनुजा यांनी ‘मधुमेह आणि आहार’ याबाबत मार्गदर्शन केले. हायपोग्लासेमिया आणि हायपरग्लासेमिया तसेच जास्त ग्लायसेनिक आणि कमी ग्लायसेनिक पदार्थांबद्दल याबाबत उपस्थितांना माहिती सांगितली. प्रश्नोत्तरांच्या सत्रात मधुमेहतज्ञ, किडनीतज्ञ आणि आहारतज्ञांनी उपस्थितांच्या मनात मधुमेहाबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रवीण सोनी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर सांगता पसायदानाने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.