Pimpri News : राज्य सरकार पडेल अशी परिस्थिती नाही, पण 2024 मध्ये … – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – राज्य सरकार पडावे ही आमची इच्छा आहे. ते पडत नसेल तर सरकारला पडण्याचा आमचा प्रयत्न नाही. सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे सरकार पडेल अशी परिस्थिती नाही आणि कुठला पक्ष फुटेल अशीही परिस्थिती नाही असे सांगत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजप, रिपाइं आणि मित्र पक्षांची युती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “काँग्रेसमध्ये बरेच आमदार नाराज आहेत. बऱ्याच आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. काँग्रेसचा वेळोवेळी आपण होत आहे. त्यामुळे काँग्रेसला माझी नम्र विनंती आहे. आमदारांना फंड मिळत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच हे राज्य चालवित आहेत. त्यामुळे काँग्रेसला पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा सरकारमध्ये काँग्रेसने राहू नये, लवकरात लवकर पाठींबा काढला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठींबा दिला तर किंवा शिवसेना आमच्या सोबत आली तरच सरकार पडेल. अन्यथा राज्य सरकार पडेल अशी परिस्थिती नाही”.

“विधानसभेची 2019 ची निवडणूक शिवसेना-भाजप युतीत लढली. पण, निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी बीजेपीच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचे काम केले. शिवसेनेने भाजप, देवेंद्र फडणीस यांना धोका दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला गेले. शिवसेनेने अजून विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर दोघांमध्ये एकमत होऊ शकते. शिवसेनेने अजून विचार करून भाजपसोबत यावे असे माझे मत असल्याचे सांगत आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार राज्यात भाजपला प्रचंड यश मिळाले आहे. लोकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 लोकसभेची निवडणूक 400 पेक्षा जास्त जागा घेऊन आम्ही जिंकणार आहोत. एनडीए पुन्हा या देशांमध्ये सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. शिवसेनेने आमच्या सोबत यावे अशी इच्छा आहे. पण, शिवसेना सोबत नाही आली तरी 2024 ची राज्यातील विधानसभा निवडणूक भाजप, आरपीआय आणि मित्र पक्ष एकत्रित लढून जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात पुन्हा आम्ही सत्तेत येऊ असा विश्वास असून त्या दिशेने आम्ही पुढे चाललो आहोत, असेही आठवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.