Article by Rajendra Pandharpure : पुणे मेट्रोच्या चाचणीसाठी लागली तब्बल 25 वर्षे!

एमपीसी न्यूज (राजेंद्र पंढरपुरे) – मेट्रो रेलची चाचणी – ट्रायल रन शुक्रवारी यशस्वी झाली. पुणेकरांना आनंद झाला अशा बातम्या झळकल्या. मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात आले. पण, या आनंदाच्या प्रसंगी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतल्यापासून, तो त्याची चाचणी होईपर्यंत तब्बल पंचवीस वर्षांचा काळ लागला आहे. 

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 1996 साली पुणे महापालिकेने मेट्रो रेल प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्याचवेळी मोनो रेल, स्काय बस अशा पर्यायांचाही विचार झाला. केंद्रीय अंदाजपत्रकात पुण्यातील मोनो रेलसाठी तरतुदी झाल्या, पण हा पर्याय मागे पडला. आणखी एक पर्याय होता तो स्काय बस. त्यासाठी चाचपणी करण्यात आली. नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने माजी महापौर दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात जाऊन स्काय बसची पहाणी केली, हा पर्यायही व्यवहार्य नसल्याने मागे पडला आणि मेट्रोचे जाळे शहरात निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत झाले.

मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. श्रीधरन आणि त्यांनी केलेला दिल्ली मेट्रो प्रकल्प हा सन 2000 च्या सुरुवातीला गाजत होता. म्हणून पुण्याच्या मेट्रोच्या आराखड्याचे काम दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडे देण्यात आले. त्यांनी आराखडा तयार केला. त्यानंतर अनुषंगिक विविध प्रशासकीय कामं, केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी यात बराच विलंब होत गेला. 2014 सालानंतर पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्प एकत्र करुन महामेट्रो ही कंपनी अस्तित्वात आली. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामाचे पुण्यात भूमिपूजन झाले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

सध्या काम प्रगतीपथावर असल्याचे पुणे, पिंपरी-चिंचवड मधील लोकांना दिसत आहे. एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. सध्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम चालू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या मार्गाचे काम प्रस्तावित आहे. तसेच पिंपरी – स्वारगेट मार्ग हा निगडी ते कात्रज आणि वनाज – रामवाडी मार्ग हा चांदणी चौक ते रामवाडी आणि स्वारगेट ते हडपसर हा नवा मार्ग असे मेट्रोचे जाळे करण्याचा पहिल्या टप्प्याचा विचार आहे. हे जाळे होण्यासाठी, सर्व कामे सुरळीतपणे पार पडल्यास आणखी किमान पाच ते सात वर्षे लागतील.

मेट्रोचा आराखडा केला त्यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवड मधील 2000 सालातील वाहतूक विचारात घेऊन नियोजन करण्यात आले होते.  त्याला आता 20 वर्षे होऊन गेली आहेत. या काळात वाहतूक आणखी वाढली आहे. वाढलेली वाहतूक आणि मेट्रोच्या कामाची गती पहाता मेट्रोचा पहिला टप्पा वाहतूक समस्येवर रामबाण उपाय ठरेल का? हा प्रश्न निर्माण होतो. मेट्रोला प्रवासी मिळावेत यासाठी मार्गालगत चार एफएसआय देऊन इमारती बांधाव्यात, असे प्रस्ताव आहेत. त्यावरही काही कार्यवाही झालेली नाही. मेट्रोचे दर किती रहाणार हे अद्याप ठरलेले नाही. मेट्रो स्टेशन झाल्यावर पीएमपीचे मार्ग बदलावे लागणार आहेत. त्याचीही तयारी झालेली नाही. मेट्रोची चाचणी झाली ही आनंदाची बाब आहे. पण, मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण झाला तरच तो उपयुक्त ठरणार आहे.

मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ चालू आहे. मेट्रोची सुरुवात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शहरांच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवला होता. त्यांच्या कारकिर्दीत केंद्रीय अंदाजपत्रकात पुण्याच्या मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली. मेट्रो कायदा अस्तित्वात आला. काँग्रेसचे माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोसाठीची अनेक प्राथमिक कामे पूर्ण केली. भाजपचे नेते, माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रो कंपनी करुन मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला चालना दिली. पालकमंत्री अजित पवार यांनी कामाची गती राखलेली आहे. आत्तापर्यंतच्या मेट्रोच्या कामात या नेत्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.