Vice Presidential Elections : जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

एमपीसी न्यूज – भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झाले. धनखड यांना पहिल्या पसंतीची 528 मते तर मार्गारेट अल्वा यांना 182  मते मिळाली.15 मते बाद झाली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी शनिवारी रात्री धनखड विजयी झाल्याची अधिकृत घोषणा केली.

धनखड यांच्या विजयामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे पिठासीन अधिकारी एकाच राज्यातील असल्याचा,उंबरच्या फलासारखा दुर्मीळ योग जुळून आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे कोटाचे खासदार असून धनखड यापुर्वी झुनझुनुमधून लोकसभेवर निवडून आले आहेत.1974 पासून सुरु असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाची यात्रा उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपली. धनखड यांच्या रुपाने आणखी एक ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी सकाळी दहापासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत मतदान झाले. मात्र बहुतेक खासदारांनी त्याआधीच मतदान केले. संसदेतील 63 क्रमांकाच्या दालनात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीत धनखड यांचे पारडे जड होते. भाजपची स्वत:ची 303 अधिक राज्यसभेची 91 अशी 394 मते असल्याने धनखड यांचा विजय निश्चित झाला होता.

नायडूंचा सोमवारी निरोप समारंभ

वर्तमान उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ दहा तारखेला संपत आहे. त्यामुळे सोमवारी नायडू यांना राज्यसभा निरोप देईल. यावेळी सर्वपक्षीय नेते भाषण करतात. त्यामुळे त्या दिवशी शून्य प्रहार व प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज रद्द करण्यात येणार आहे.यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरु झाल्यानंतर तब्बल महिनाभराने राज्यसभेत येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.