Pune : पुण्याच्या विकास कामांमध्ये खीळ घालणारा अर्थसंकल्प – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि परिसरात गेली पाच वर्षे वेगाने सुरू असलेल्या विकास कामांमध्ये खीळ घालणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून, त्यामुळे पुणेकरांची घोर निराशा झाली आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी केली.

या अर्थसंकल्पात कुठल्याही नवीन योजनांचा समावेश नाही. मेट्रो, एचसीएमटीआर, पाणीपुरवठा, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर एक रुपयाचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे.

शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. दहा लाख युवकांना रोजगार देण्याची घोषणा फसवी आहे. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत केवळ ‘प्रशिक्षणार्थी‘ म्हणून अनुभव मिळणार आहे. महिला सक्षमीकरण आणि महिलांवर होणार्‍या वाढत्या अन्यायाविरुद्ध ठोस उपायोजनांचा अभाव आहे. मागासवर्गीय समाज बांधवांसाठी कोणतीही नवीन योजना नाही.
एकंदरीत कोणतीही नवीन विकासकामे आणि योजनांचा अभाव असणारा आणि निधीची तरतूद नसलेला हा अर्थसंकल्प कोणत्याही समाज घटकाला न्याय देऊ शकणारा नाही, तो मांडण्याचा केवळ सोपस्कार अर्थमंत्र्यांनी पार पाडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.