Nigdi : विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी शिक्षक जेरबंद

एमपीसी न्यूज – एका 15 वर्षीय विद्यार्थीनीला ‘तू महिना अखेरला मला एकटी येऊन भेट, तू माझ्यावर प्रेम करतेस काय? तू माझ्याशी लग्न करतेस का?, तुला पैशाची गरज आहे का, फिरायला जायचे काय’ असे म्हणत शिक्षकाने तिचा हात धरून वियनभंग केला. हा धक्कादायक प्रकार निगडीतील किर्ती विद्यालयात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

निवृत्ती देवराम काळभोर (वय 51, रा. अवदुंबर निवास, साई हौसिंग सोसायटी, गुरूव्दारा चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी 15 वर्षीय विद्यार्थीनीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी निगडी, प्राधिकरणातील किर्ती विद्यालयात शिकत आहे. एक महिन्यापूर्वी फिर्यादी ही आरोपी काळभोर याच्या केबिनमध्ये संरक्षणशास्त्र व्यवसाय या विषयाची वही कधी जमा करायची आहे, असे विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी काळभोर याने इतर मुलींची वही जमा आहे, ‘तू महिना अखेरला मला एकटी येऊन भेट, तू माझ्यावर प्रेम करतेस काय? तू माझ्याशी लग्न करतेस का?, तुला पैशाची गरज आहे का, फिरायला जायचे काय’ असे म्हणाला.

तसेच विद्यालयातून फिर्यादी मुलगी स्कूलबसमधून घरी जाताना आरोपी शिक्षकाने तिचा हात धरत तिला थांबण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीने मला क्लासला जाऊ द्या, नाहीतर मी जोरात ओरडेन अशी धमकी दिल्याने शिक्षकाने हात सोडला. निगडी ठाण्याच्या फौजदार सीता वाघमारे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.