BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : जाखमाता व गवळीवाडा गोविंदा पथकांनी फोडल्या मानाच्या हंडी

एमपीसी न्यूज : तुंगार्ली येथील जाखमाता गोविंदा पथकाने शनिवारी रात्री 10 वाजता सहा मानवी मनोरे रचत लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी फोडली. तर गवळीवाडा गोविंदा पथकाने जयचंद चौकातील लोणावळा विकास प्रतिष्ठान व रणरागिणी ग्रुपची हंडी रात्री 11 वाजता सहा मानवी मनोरे रचत फोडली.

मावळ वार्ता फाउंडेशन, स्पेसलिंक केबल नेटवर्क, लोणावळा शहर पत्रकार संघ, सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्या वतीने मागील 18 वर्षापासून शहरातील शिवाजी महाराज चौकात या मानाच्या हंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी गोविंदा पथकांना 7 लाख 77 हजार 777 रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. तर लोणावळा विकास प्रतिष्ठानचे महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून याठिकाणी गोविंदा पथकांकरिता 6 लाख 66 हजार 666 रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

सणउत्सव साजरे करताना सामाजिक भान या दोन्ही आयोजकांकडून जपण्यात आले. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना दोन्ही आयोजकांकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांचा निधी देण्यात आला तसेच दहिहंडीला सलामी देणार्‍या मुंबई व लोणावळा परिसरातील प्रत्येक गोविंदा पथकाने सलामीच्या रक्कमेतील 1 हजार रुपये निधी जमा केला. पारंपारिक सण उत्सव साजरा करताना जपलेले सामाजिक दायित्व हाच यावर्षीच्या महोत्सवातून दिलेला संदेश असल्याची भावना माजी आमदार दिगंबर भेगडे व पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी व्यक्त केली.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र टेलर, दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान व पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू येवले, किरण गायकवाड यांच्या हस्ते हंडीचे पुजन करत महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. तर चार वाजता लोणावळा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश परमार, कार्याध्यक्ष बाळासाहेब कडू, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ व सदस्यांकडून हंडीचे पूजन करत महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

दोन्ही ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात शहरातील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला तर मुंबईकर पथकाने सलाम्या दिल्या. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदींनी दहीहंडी महोत्सवाला भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दहीहंडीचा महोत्सव उत्साहात पार पडला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement