Pune : बरगडीच्या हाडाच्या उपयोगाने जबड्याला मिळाला सांधा ! लहानग्या सलमानचा चेहरा सरळ करण्यात दुर्मिळ सर्जरीद्वारे यश

रंगूनवाला दंत रुग्णालयात डॉ.जे.बी.गार्डे यांनी केली दुर्मिळ शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – जबड्याला उर्वरित डोक्याच्या भागाशी जोडणारा  कानाजवळचा सांधाच जन्मतः नसलेल्या लहानग्या रुग्णाला त्याच्याच बरगडीतून मिळवलेल्या हाडाच्या तुकड्याच्या रोपणाची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून वाकडा झालेला चेहरा सरळ करण्यात पुण्याच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे ओरल सर्जरी विभागप्रमुख  डॉ.जे.बी.गार्डे यांना यश मिळाले आहे.   

‘सांग दर्पणा कशी मी दिसते’ हा प्रश्न फक्त वयात येणाऱ्या मुलींनाच पडतो असं नाही. तो एखाद्या लहान मुलालाही पडू शकतो. आणि आरश्यात पाहिल्यावर आपला चेहरा दिवसेंदिवस वाकडा होत आहे हे पाहून ते लहान मूलही अस्वस्थ होऊ शकतं. नेमकं असंच घडलं आठ वर्षांच्या सलमान आणि त्याच्या आईवडिलांसोबत. वर्गातल्या इतर मुलांसारखा आपला चेहरा आणि तोंड प्रमाणबद्ध का नाही हा सवाल त्यांनी अनेक डॉक्टरांना केला पण समाधानकारक खुलासा,उपचार  होऊ शकला नाही.

अखेरीस त्यांना ह्या समस्येवर पुण्यातील कॅम्प भागातील एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये  उत्तर मिळाले तेथील ओरल सर्जरी विभागप्रमुख डॉ जनार्दन गार्डे यांनी छोट्या सलमानच्या आवश्यक त्या तपासण्या करून अचूक निदान केले. सलमानला जबड्याच्या एका बाजूचा सांधा आणि जबड्याच्या हाडाचा अर्धा भागच नव्हता. शरीराची गर्भावस्थेत नैसर्गिकरीत्या वाढ होतांना क्वचित असं होतं की एखादा अवयव तयारच होत नाही. शास्त्रीय भाषेत याला अप्लासिया (aplasia)असे म्हटले जाते. जबड्याच्या सांध्याच्या बाबतीत ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानली जाते. बिचाऱ्या सलमानच्या बाबतीत निसर्ग एका बाजूचा सांधाच निर्माण करायला जणू विसरला होता व त्यामुळे जसेजसे वय वाढत गेले तसतसे एक बाजू आक्रसली जाऊन त्याचा चेहरा आणि तोंड वाकडे दिसू लागले होते.

हे निदान कळल्यावर त्याच्या आईवडिलांना साहजिकच चिंता वाटू लागली.डॉ जनार्दन गार्डेंनी त्यांना दिलासा देत उपचारांची विचारपूर्वक आखणी केली व शस्त्रक्रिया करून सलमानच्याच एका बरगडीचे रोपण जबड्याच्या सांध्याच्या जागी केले. ही शस्त्रक्रिया अर्थातच अवघड व आव्हानात्मक मानली जाते. परंतु डॉ. गार्डे, डॉ.प्रशांत माल आणि डॉ.अश्विनी वडणे यांनी अतिशय कुशलपणे ती यशस्वीपणे पार पाडली.

सलमानचा चेहरा आता प्रमाणबद्ध दिसू लागला असून तो तोंडावाटे व्यवस्थित जेवणही करू लागला आहे. तसेच बरगडीच्या कुर्चेत हाड वाढण्याची क्षमता असते ज्यामुळे भविष्यात त्याच्या जबड्याची वाढही नेहमीसारखी होईल, असे डॉ.जनार्दन गार्ड यांनी सांगितले.

सलमानचे पालक समाधानी असून त्यांनी रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे  व हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व परिचारिकांचे मनापासून आभार मानले आहेत.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, इनामदार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.परवेझ इनामदार, प्राचार्य डॉ. रमणदीप दुगल तसेच दंत महाविद्यालयाचे रजिस्ट्रार रझाक शेख यांनी डॉ.जनार्दन गार्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.