Maharashtra : जय जय महाराष्ट्र माझा…हे गीत महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत; सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल 62 वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या (Maharashtra) मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधीच या संदर्भात संकेत दिले होते. काही महिन्यांपूर्वी याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकही झाली होती. राज्यगीत म्हणून निवडीसाठी अनेक गीतं सरकारसमोर होती. मात्र, त्यातून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत निवडण्यात आलं आहे. (Maharashtra) हे गीत आजही महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जातं. अनेक सभासमारंभांमध्ये व राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते गायलंही जात होतं. मात्र, त्याला राज्यगीताचा अधिकृत दर्जा नव्हता. तो अखेर मिळाला आहे.

देशातील सध्या केवळ 12 राज्यांचं स्वत:चं अधिकृत राज्यगीत आहे. त्यात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या राज्यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र गीताचा इतिहास

 

‘महाराष्ट्र गीत’ अशी ओळख असलेलं जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गायलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.