रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune : वैचारिक प्रगल्भतेतूनच महिला सक्षमीकरण शक्य – जयंती कठाळे

एमपीसी  न्यूज – “महिला सक्षमीकरण केवळ चर्चा करून होत नाही. त्यासाठी वैचारिक प्रगल्भतेतून त्यांच्या मनगटात बळ भरण्याचे काम पुरुषांनी करावे. व्यवसायातील यशामागे आपल्या जोडीदाराची साथ अतिशय महत्त्वाची असते. बाईच्या मनातील कल्पनेला प्रोत्साहन दिले, तर तीही मोठा व्यवसाय उभारू शकते,” असे मत मनस्विनी फूड आणि हॉटेल पूर्णब्रह्मच्या संचालिका जयंती कठाळे यांनी केले. 

मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयंती कठाळे बोलत होत्या. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी मनस्विनी फूडचे संचालक मनीष शिरसाव, युनिक अॅटोमेशनचे भरत भुजबळ, फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी, शिरीष देशपांडे आदी उपस्थित होते.

सुपनेरकर भोजन प्रबंधच्या संचालिका मीना सुपनेरकर, मेगाक्राफ्ट एंटरप्रायझेसच्या संचालिका अंजली आपटे, राकेश ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीजचे संचालक प्रताप जाधव आणि अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांना यंदाचा ‘आदर्श उद्योजक-उद्योजिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. फोरमच्या बैठकांसाठी सभागृह उपलब्ध करून देणार्‍या जयंत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

जयंती कठाळे म्हणाले, “एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय उभारता येतो. आपल्यातील ठिणगीला आग लागली पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून उभे राहिले पाहिजे. मराठी उद्योजकांनी जागतिक स्तरावर जाऊन काम केले पाहिजे. आज पूर्णब्रम्ह जगभरात सात्विक भोजन देण्याचे काम करीत आहे. येत्या काळात जगभरात पाच हजार शाखा उघडणार आहोत. कार्यक्षेत्र विस्तृत करतानाच व्यवसायात मूल्ये जावीत.”

भरत भुजबळ म्हणाले, “ठेविले अनंते तैसेची रहावे या मानसिकतेतून आपण बाहेर पडून व्यवसायाकडे वळावे. व्यावसायिकांनी एकमेकांना पूरक काम केले पाहिजे. त्यातूनच आपण एकत्रित प्रगती करू शकतो.”

मीना सुपनेरकर, अंजली आपटे, प्रताप जाधव, ज्ञानेश्वर बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जाई देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार तळेकर यांनी आभार मानले.

spot_img
Latest news
Related news