Talegaon Dabhade News : नगरपरिषदेचा ढिम्म कारभार; आरटीओ नोंदणी न करताच सहा महिन्यांपासून चालवला जातोय जेसीबी

एमपीसी न्यूज – मागील सहा महिन्यांपासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी आरटीओ नोंदणीशीवाय काम करत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला कायम मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनावर ही वेळ आली असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच नवीन मुख्याधिकारी म्हणून सतीश दिघे यांनी पदभार घेतला आहे. आता नवे मुख्याधिकारी जेसीबीच्या नोंदणीची प्रक्रिया पुढे नेणार की ‘चल रहा है चलने दो’ अशी भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने नव्याने खरेदी केलेला जेसीबी सुमारे सहा महिने आरटीओ कडून रजिस्टर नोंदणी न करताच तसाच अव्याहतपणे चालविला जात आहे.या जेसीबीवर नगर परिषदेने आत्तापर्यत आरटीओकडून रजिस्टर नोंदणी नसताना देखील लाखो रुपये खर्ची टाकले आहेत.

नगरपरिषदेने एप्रिल 2021 मध्ये नवीन जेसीबी  वाहन 21 लाख  84 हजार 180 रुपयाला खरेदी केले. त्यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते पूजन करून हा जेसीबी लोकार्पण करण्यात आला. पुढे तो नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. तेव्हापासून आरोग्य विभागात या वाहनाचा वापर करण्यात येतो.

हा जेसीबी दररोज आरोग्य विभाग, उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग यांच्याकडे कामानुसार चालविला जात असतो.नगर परिषदेच्या कचरा डेपोतील कामावर त्याचा जास्त वापर झाला असल्याने व तो आरोग्य विभागाच्या ताब्यात असल्याने त्याच्यावर आरोग्य विभागाच्या शिफारसीनुसार डिझेलसाठी आत्तापर्यंत 98 हजार 501 रुपये खर्च झाला आहे. तसेच चालक व मजूर यांच्या पगारासाठी 3 लाख 14 हजार 529 रुपये ऑगस्ट पर्यंत खर्च करण्यात आला आहे.

नगर परिषदेने आत्ता पर्यंत  जेसीबीची पिंपरी – चिंचवड येथील आरटीओकडे नोंदणी केली नाही.तो तसाच नोंदणीविना चालविला जात आहे. आरटीओ नोंदणी न होता हे वाहन शासनाच्या नियमाच्या विरुध्द आरोग्य विभागाकडून का चालवले जात आहे.? या प्रश्नावर उलट सुलट चर्चा होत आहे.

नगर परिषदेला कायम मुख्याधिकारी नसल्यामुळे जेसीबी रजिस्टर नोंदणी करण्याचे काम होऊ शकले नाही असे याबाबतचे काम करणारे अधिकारी सांगत आहेत. आता नवनिर्वाचीत मुख्याधिकारी काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.