Jejuri Crime News : तंबाखू न दिल्याच्या रागातून मित्राचा खून; जेजुरी येथील घटना

एमपीसीन्यूज : तंबाखू न दिल्याच्या रागातून मित्राचा खून केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही केली आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

सागर बापू शिंदे (वय 29 रा. कुपवाड, जि. सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी दत्ता दिगंबर ठोंबरे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल देवेंद्र खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत एकमेकांचे चांगले मित्र असून ते बिगारी कामगार आहेत. मिळेल ती कामे करून ते आपली उपजीविका भागवत. सोमवारी सायंकाळी कामावरुन आल्यानंतर ते एकत्र बसले होते. दत्ता ठोंबरे याने सागर शिंदे याला तंबाखू मागितली.

परंतु, त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चिडलेल्या दत्ता ठोंबरे याने जवळ पडलेली वीट उचलून सागर शिंदे यांच्या डोक्यात मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सागरचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक माने करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.