Jejuri News : जेजुरी परिसरात दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीरा गावातील दोन एटीएम सेंटरमध्ये मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेजुरी पोलिसांनी एका तरुणावर याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजी रामकिसन घाडगे (वय 28, रा. राख, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विवेक महादेव कुंभार (वय 35, रा. नीरा, ता. बारामती) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीरा गावात आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. आरोपी शिवाजी याने सोमवारी (दि. 17) पहाटे पावणे एक वाजताच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्याने एटीएम सेंटरमधील कॅमे-यावर पांढरा कागद चिकटवला. त्यानंतर शिवाजी याने एटीएमच्या वायर काढून एटीएम हलवण्याचा प्रयत्न केला. एटीएमचा कॅश डिस्पेन्सर तोडून रोकड पळवली.

त्यानंतर आरोपी शिवाजी याने नीरा बस स्थानकाच्या समोर असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएम आणि आशिष सिनेमागृहाजवळ असलेली ईश्वर पवार यांची टपरी देखील फोडण्याचा प्रयत्न केला. याबबत आयडीबीआय बँकेचे कर्मचारी विवेक कुंभार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.